बिहार 2022 मध्ये संपन्न राज्य असेल: मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला पाटणा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करण्याची आणि भेटण्याची संधी मिळाली. बिहारच्या या भूमीला मी वंदन करतो आणि या विद्यापीठाचेही आभार मानतो की, या विद्यापीठाने देशासाठी योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांना कायम प्रोत्साहित केले आहे.

नवी दिल्ली - भारत जेंव्हा 2022 साली स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करेल, त्यावर्षी बिहार हे एक संपन्न राज्य असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटणा विद्यापीठाच्या शताब्दीपुर्ततेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. तसेच मोदींनी 20 विद्यापीठांना 10 हजार कोटींची मदत करणार असल्याचीही घोषणा केली.

मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला पाटणा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करण्याची आणि भेटण्याची संधी मिळाली. बिहारच्या या भूमीला मी वंदन करतो आणि या विद्यापीठाचेही आभार मानतो की, या विद्यापीठाने देशासाठी योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांना कायम प्रोत्साहित केले आहे, असेही गौरवोद्गार यावेळी पंतप्रधानांनी काढले.

नितीश कुमार यांची स्तुती करताना पंतप्रधान म्हणाले, की बिहारच्या विकासाचा दिलेला शब्द त्यांनी पाळला आहे. नितीश यांनी केलेले बिहारमधील उपक्रम हे अत्यंत स्तुत्य असे आहेत. आम्हीही केंद्रात पुर्व भारताच्या विकासाला प्राधान्य देत आहोत. नवनवीन तंत्रज्ञानावर काम करणे जास्त आवश्यक आहे. परंपरागत शिक्षणाकडून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्याला जगभरातील बदल आणि स्पर्धा समजून घेणे जास्त आवश्यक आहे. यामुळे आपल्या देशाचे जगातील स्थान टिकून राहण्यास मदत होईल.

नितीश कुमार लोकशाही आघाडीत परतल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. जनता दलाने लालुंच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबतची युती तोडून भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केल्यावर पहिल्यांदाच पंतप्रधान बिहारच्या दौऱ्यावर होते.

पंतप्रधानानी 2015 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 1.25 लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचे आश्वासन दिले होते, त्यावेळी भाजप आणि जदय़ू एकमेकांच्या विरोधात होते. बिहारमध्ये 17 वर्षापासून दोन्ही पक्षाची युती होती परंतु, 2013 मध्ये भाजपने मोदींना लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यामुळे जेडीयुने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

पाटणा विद्यापीठाच्या या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते. मी या कार्यक्रमाला मंत्री म्हणून नाही तर या विद्यापीठाचा एक माजी विद्यार्थी म्हणून आलो आहे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, अश्विनी चोबे आणि उपेंद्र खुशावह आदि. मान्यवर उपस्थित होते.