भाजपवाल्यांना केवळ बोलायची सवय आहे: राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

ते या अस्वस्थतेचा वापर दलित, मुस्लिम व इतर अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेष पसरविण्यासाठी करत आहेत. मात्र संताप व द्वेष यांचे रुपांतर रोजगारामध्ये होणार नाही. किंबहुना द्वेषाची ही प्रक्रिया एकदा सुरु झाली; की तिच्यावर कोणाचे नियंत्रण राहत नाही

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महत्त्वपूर्ण मुद्यांवरुन लक्ष हटविण्यासाठी आता द्वेषाचा आधार घेत असल्याची तीव्र टीका कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

"मोदीजी, तुमच्या अगणित आश्‍वासनांचे काय झाले, अशी विचारणा देशभरातील तरुण पंतप्रधानांना करत आहेत. पंतप्रधानांच्या दर दोन वाक्‍यांमागे त्यांनी एक आश्‍वासन दिले आहे. दर वर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्‍वासन हे त्यापैकीच एक आहे. मात्र याउलट पंतप्रधानांकडून भारताला बेरोजगारी मिळाली आहे. बेरोजगारीचे हे प्रमाण गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे. भाजपवाल्यांना केवळ बोलायची सवय आहे; ऐकण्याची नव्हे. उलट कॉंग्रेस पक्षामध्ये सर्वसमावेशकतेस महत्त्व आहे,'' असे गांधी यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना सांगितले.

बेरोजगारीचे देशातील वाढते प्रमाण अत्यंत धोकादायक असल्याचे सांगत गांधी यांनी पंतप्रधान व त्यांचा राजकीय पक्ष जनतेमधील भय व अस्वस्थतेचा वापर करुन संताप व द्वेष पसरवित असल्याचा आरोप यावेळी केला.

"पंतप्रधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची विचारसरणी ही भय व अस्वस्थतेचा वापर करुन संताप व द्वेष पसरविणारी विचारसरणी आहे. ते या अस्वस्थतेचा वापर दलित, मुस्लिम व इतर अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेष पसरविण्यासाठी करत आहेत. मात्र संताप व द्वेष यांचे रुपांतर रोजगारामध्ये होणार नाही. किंबहुना द्वेषाची ही प्रक्रिया एकदा सुरु झाली; की तिच्यावर कोणाचे नियंत्रण राहत नाही,'' असे गांधी म्हणाले.

या सरकारमध्ये दूरदृष्टी वा सहानुभूती अशा दोन्ही बाबी दिसत नसल्याचे टीकास्त्रही गांधी यांनी यावेळी सोडले.