राहुल यांची चिनी राजदूतासोबत भेट आणि काँग्रेसचा गोंधळ

पीटीआय
मंगळवार, 11 जुलै 2017

काँग्रेसचे केविलवाणे प्रयत्न
परंतु, परदेश दौऱ्यावरून गेल्या आठवड्यात परत आल्यानंतर राहुल गांधींनी चिनी सैन्याच्या आक्रमकतेवरून सरकारला धारेवर धरणारे ट्‌विट केले होते. पाठोपाठ काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन चिनी सैन्याच्या घुसखोरीवरून सरकारवर आसूड ओढले होते. या पार्श्‍वभूमीवर राहुल यांच्या भेटीवरून निर्माण झालेल्या गोंधळात काँग्रेसकडूनच भर घातली गेली. हे वृत्तच बनावट असल्याची टिप्पणी करणे आणि नंतर भेट झाल्याचे जाहीरपणे मान्य करणे या परस्परविरोधी भूमिकांमुळे वाढलेला घोळ निस्तरण्याचा काँग्रेसतर्फे झालेला प्रयत्नही केविलवाणा दिसला. या गोंधळानंतर सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांसमोर येण्याचे टाळले, तर राहुल यांच्या भेटीबाबत परस्परविरोधी माहिती का देण्यात आली, या पत्रकारांच्या प्रश्‍नांवर तिवारी यांनीही उत्तर देण्यास नकार दिला.

नवी दिल्ली : गांधी कुटुंबीयांच्या कार्यक्रमांबाबत राखली जाणारी गोपनीयता आज काँग्रेसच्या चांगलीच अंगलट आली. निमित्त होते चीनशी असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी चिनी राजदूताची भेट घेतल्याचे. आधी भेटीच्या बातम्या बनावट ठरविणे आणि नंतर स्वीकारणे अशा परस्परविरोधी भूमिकांचा काँग्रेसला जोरदार फटका बसला. या प्रकरणात खुद्द राहुल गांधींनी, भेटीच्या वृत्ताला दुजोरा देताना यावर आक्षेप घेणाऱ्यांनी आधी केंद्रीय मंत्र्यांच्या चीन दौऱ्यावर खुलासा करावा, असे आव्हान सरकारला देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु, माध्यम संपर्काबाबत काँग्रेसमध्ये अजूनही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत चिनी राजदूताची शनिवारी भेट घेतल्याची माहिती चिनी वकिलातीच्या संकेतस्थळावर सकाळीच प्रसिद्ध झाली. त्यानंतर माहिती माध्यमांमध्येही पसरली आणि त्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रयत्न सुरू झाले. मात्र काँग्रेसकडूनच नव्हे, तर राहुल गांधींच्या कार्यालयातूनही यावर दुपारी उशिरापर्यंत दुजोरा देण्यात आला नव्हता. दुसरीकडे चीनशी असलेल्या तणावाचा दाखला देत सत्ताधारी भाजपच्या वर्तुळातून या भेटीबद्दल राहुल गांधींवर टीकेचा आसूड ओढणे सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्‌विट करून ही बातमी फेक (बनावट) असल्याचे म्हटले. तसेच आयबी आणि परराष्ट्र मंत्रालयाची सूत्रे "भक्तांमध्ये' (भाजप समर्थक) बातम्या पेरीत असल्याचाही आरोप केला. मात्र दुपारी दुसरे ट्‌विट करून या भेटीला दुजोरा दिला. पाठोपाठ काँग्रेसच्या दैनंदिन वार्तालापादरम्यानही प्रवक्ते मनीष तिवारी यांनी राहुल गांधींची चिनी राजदूताशी भेट झाल्याचे सांगितले. आणि सायंकाळी खुद्द राहुल गांधींनीही ट्‌विट करून या भेटीच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले.

राहुल यांचे 'टायमिंग' संशयास्पद : भाजपचा हल्लाबोल 

मुख्य प्रवक्ते सुरजेवाला यांचे सुधारित ट्‌विट, प्रवक्ते मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसची मांडलेली अधिकृत भूमिका आणि खुद्द राहुल गांधींचे ट्‌विट यामध्ये, भेटीचे समर्थन करण्यात आले आणि राजकीय कामकाजाचा भाग म्हणून राहुल यांनी चिनी राजदूताप्रमाणेच भूतानचे राजदूत, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, या भेटीवर प्रश्‍न उपस्थित झाल्यावरून काँग्रेस आणि राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची "जी-20' बैठकीदरम्यान घेतलेली अनौपचारिक भेट तसेच प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा आणि महेश शर्मा या केंद्रीय मंत्र्यांचा चीन दौरा आणि "इंडिया फाउंडेशन' या भाजप नेत्यांशी संबंधित संस्थेच्या शिष्टमंडळाची चीन भेट या मुद्द्यावरून सरकार आणि भाजपवर प्रहार करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.