दिल्ली - आपच्या बांधकाम मंत्र्यांच्या घरावर सीबीआयचे छापे

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

बांधकाम विभागात काही नवीन नियुक्त्या केल्या त्या संदर्भात हे छापे टाकण्यात आले. जैन यांच्या घरासह अन्य पाच कार्यालयांवर व व्यक्तिंच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत, असे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : आज सकाळी (ता. 30) केंद्रीय अन्वेषण विभागाने दिल्लीचे बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर छापे टाकून तपासणी केली. बांधकाम विभागात काही नवीन नियुक्त्या केल्या त्या संदर्भात हे छापे टाकण्यात आले. जैन यांच्या घरासह अन्य पाच कार्यालयांवर व व्यक्तिंच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत, असे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तसेच जैन यांच्यावर बांधकाम विभागाच्या विविध प्रकल्पांसाठी वास्तूतज्ज्ञांची नेमणूक करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा नवीन आरोप लावण्यात आला आहे. बांधकाम विभागाने 24 नवीन लोकांना मोहल्ला क्लिनीकसाठी नियुक्त करायचा करार केला होता, पण त्यात पारदर्शकता नसल्याचे सीबीआयने सांगितले. 

या छाप्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत मोदींना सवाल केला की, 'पंतप्रधान मोदींना नक्की काय हवे आहे?'. सीबाआयने लगेच घातलेल्या या छाप्यांमुळे सामान्य नागरिकांना दिल्ली सरकारने केलेल्या कामांपासून विचलीत करत आपच्या नेत्यांना उगाच लक्ष्य करणे हे गैर आहे. 

'सहा महिन्यांपूर्वी सीबीआयचे काही अधिकारी माझ्याही घरी आले होते. आम्ही दिल्ली शहरात शिक्षण, पाणी, वीज व अन्य इतर अडचणी दूर व्हाव्यात यासाठी काम करतो, त्यामुळे अशा छाप्यांमधून काहीही सिद्ध होणार नाही. हे फक्त दिल्लीच्या जनतेचे लक्ष वळविण्यासाठी केलेल प्रकार आहेत व आमची कामे त्यांच्यासमोर येऊ नयेत यासाठी केलेला हा प्रयत्न आहे', असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले. 

आजचा छापा हा जैन यांची मुलगी सौम्या जैन यांना राज्य सरकारच्या मोहल्ला क्लिनीक प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आल्यावर टाकण्यात आला. पण या छाप्यात काहीही हाती लागले नाही, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: raid on residence of pwd minister of delhi