राजस्थानातील पूरस्थिती गंभीर; वसुंधराराजे यांनी घेतला आढावा

वृत्तसंस्था
सोमवार, 31 जुलै 2017

जयपूर: राजस्थानच्या अनेक भागात पूरस्थिती असून जोधपूर विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम आणि राजस्थानात पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाच्या कुटुंबीयास दोन लाखांची मदत जाहीर केली.

जयपूर: राजस्थानच्या अनेक भागात पूरस्थिती असून जोधपूर विभागाला सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम आणि राजस्थानात पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाच्या कुटुंबीयास दोन लाखांची मदत जाहीर केली.

राज्यातील पुरामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वेसेवेवर विपरित परिणाम झाला आहे. जोधपूर मंडळातील रेल्वेसेवा विस्कळित झाली असून, दोन गाड्या रद्द केल्या तर बाराहून अधिक गाड्या टप्प्याटप्प्याने सोडल्या जात आहेत. पूरस्थितीचे गांभीर्य पाहून डॉक्‍टरांच्या सुट्या रद्द केल्या असून, पूरग्रस्त भागात डॉक्‍टरांचे पथक रवाना करण्यात येत आहे. पूरग्रस्त जिल्ह्यात लष्कर आणि जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी मदतकार्य युद्धपातळीवर करत आहेत. पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे. यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. जोधपूर विभागातील नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली असून, जालोर जिल्ह्यातील नेहड क्षेत्रातील 80 गावे आणि वाड्या वस्ती पाण्याने वेढले गेले आहेत. वेधशाळेने येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

वसुंधराराजे यांचा हवाई दौरा
मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी सोमवारी पूरग्रस्त जालोरचा हवाई दौरा केला. मारवाड प्रदेशच्या जालोर, सिरोही, पाली आणि बाडमेर आदी जिल्ह्यातील नागरिक गेल्या दहा दिवसांपासून पुराचा सामना करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच केंद्राकडे तातडीची मदतीची मागणी केली. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारकडून 196 गोशाळेला 21.24 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने राजस्थानातील पूरग्रस्तभागासाठी मदतीची घोषणा केली आहे. त्यानुसार पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांस प्रत्येकी दोन-दोन लाख, तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Web Title: rajasthan news flood in rajasthan