माओवाद्यांकडून पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट ?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जून 2018

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधींप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

पुणे : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधींप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. जानेवारीमध्ये झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली. पोलिसांनी या पाच जणांना नक्षलवादी असल्याचा संशय व्यक्त केला त्यानुसार पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली. 

याबाबत सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी विशेष न्यायालयात सांगितले, की अटक केलेल्या पाच जणांकडून जप्त केलेले साहित्य बंदी असलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) राजकीय हत्येचा कट रचत होती. तसेच सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन व रोना विल्सन हे शस्त्र खरेदीच्या प्रयत्नात होते. यासाठी या पाचही जणांचे जवळचे संबंध असलेली सीपीआय (एम) निधी पुरवणार होती. न्यायालयाकडे आरोपींची पोलिस कोठडी मागताना या सगळ्यांविरोधात हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा असल्याचेही पवार यांनी सांगितले.

दरम्यान, विल्सन यांच्या घरातून एक पत्र मिळाले असून, या पत्रामध्ये राजीव गांधींवर झालेल्या हल्ल्याप्रमाणे हल्ला करण्याचा संदर्भ आहे. राजीव गांधी भारताचे माजी पंतप्रधान असल्याचा संदर्भ लक्षात घेता आणि सध्याचे वातावरण पाहता या हल्ल्याचा कट नरेंद्र मोदींच्या विरोधात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

त्या पत्रातला उल्लेख काय?

'मोदींच्या नेतृत्त्वाखाली हिंदू हुकूमशाही राजवटीने आदिवासींवर अत्याचार चालविले आहेत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांचे मोठे पराभव झाले. तरीही मोदी यांनी देशातील १५ राज्यांमध्ये भाजपचे सरकार स्थापन केले. हा  वेग असाच कायम राहिला, तर पक्षाला सगळ्या पातळ्यांवर त्याचा फटका बसेल.

कॉम्रेड किसन आणि इतरांनी मोदी राजवट संपविण्याबाबत काही ठोस पावले उचलण्याचे सुचविले आहे. राजीव गांधीसारख्या आणखी एका प्रकाराचाही आम्ही विचार करत आहोत. हा प्रयत्न प्रचंड धोकादायक असेल आणि त्यात अपयशी होण्याची शक्यताही अधिक असेल. पण या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करायला हवा', असे त्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Rajiv Gandhi Style Attack Plan For Narendra Modi By Maoist