जेठमलानींच्या ताशेऱ्यामुळे राज्यसभेत गदारोळ

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

जेटलींवर अप्रामाणिकपणाचा आरोप; भाजप सदस्य संतप्त

नवी दिल्लीः राम जेठमलानी यांनी आज खुद्द अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच अप्रामाणिकपणाचा जाहीर ठपका ठेवल्याने राज्यसभेत एकच गदारोळ माजला. जेठमलानींच्या ताशेऱ्यामुळे खवळलेल्या भाजप सदस्यांनी त्यांना बोलूच न देण्याचा पवित्रा घेतला. या वेळी अनेक मंत्रीच गोंधळ घालताना पाहून राज्यसभाध्यक्ष हमीद अन्सारी यांनी त्यांना पदाचा मान राखण्याबाबत वारंवार इशारा दिला. त्यानंतर त्यांनी जेठमलानींचे ते शब्दही कामकाजातून वगळले.

जेटलींवर अप्रामाणिकपणाचा आरोप; भाजप सदस्य संतप्त

नवी दिल्लीः राम जेठमलानी यांनी आज खुद्द अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच अप्रामाणिकपणाचा जाहीर ठपका ठेवल्याने राज्यसभेत एकच गदारोळ माजला. जेठमलानींच्या ताशेऱ्यामुळे खवळलेल्या भाजप सदस्यांनी त्यांना बोलूच न देण्याचा पवित्रा घेतला. या वेळी अनेक मंत्रीच गोंधळ घालताना पाहून राज्यसभाध्यक्ष हमीद अन्सारी यांनी त्यांना पदाचा मान राखण्याबाबत वारंवार इशारा दिला. त्यानंतर त्यांनी जेठमलानींचे ते शब्दही कामकाजातून वगळले.

जमीन किंवा सोन्याची खरेदी करून काळ्या पैशाला पळवाटा देण्याचे प्रकार बंद होण्यासठी सरकारने केलल्या काही कडक आर्थिक उपायांमुळे व रोखीने व्यवहार करण्यावर घातलेल्या विविध बंधनांमुळे हे प्रमाणही कमी झाल्याचे निरीक्षण जेटली यांनी नोंदविले. मॉरिशस, सिंगापूर व सायप्रसबरोबर करार करून केंद्र सरकारने काळ्या पैशाच्या या मुख्य पळवाटाही बंद केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र 15-15 लाख रुपये बॅंक खात्यांवर जमा करण्याच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्यापासून नरेंद्र मोदींच्या दाव्याचे काय झाले, या प्रश्‍नावर ते आजही निरुत्तर झाले.

प्रश्‍नावलीतील 198 क्रमांकाच्या दुसऱ्याच प्रश्‍नावेळी ही जेटली-जेठमलानी चकमक झडली. मूळ प्रश्‍न राजीव गौडा यांचा होता. त्याला जेटली यांनी दिलेले उत्तर ऐकून जेठमलानी यांनी पूरक प्रश्‍नाच्या सुरवातीलाच शेरा मारला. त्यानंतर भाजपच्या खासदार व मंत्र्यांनी एकच गोंधळ सुरू केला. आनंद शर्मा यांच्यासह कॉंग्रेस सदस्यांनी या भाजप मंत्र्यांचे एकूणच वर्तन व त्यांची भाषा याबाबत तीव्र आक्षेप नोंदविले. त्यावर जेठमलानी यांचे असंसदीय शब्द अन्सारी यांनी तत्काळ कामकाजातून काढून टाकले व जेठमलानींना फक्त प्रश्‍न विचारण्यास सांगितले. मात्र नंतरही जेठमलानी यांनी टिप्पणी सुरू केल्यावर अन्सारी यांनी त्यांना परवानगी नाकारून पुढचा प्रश्‍न पुकारला. याच्या निषेधार्थ जेठमलानी सभात्याग करू लागताच जेटली यांनी स्वतःच उभे राहून त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तर दिले. जेठमलानी यांचा मूळ प्रश्‍न होता की स्विस बॅंकेत काळा पैसा दडविलेल्या 14 हजार भारतीयांची नावे जर्मन सरकारला माहिती झाली आहेत व त्यांनी ती भारताला देण्याचीही तयारी दाखविली आहे. यावर केंद्राने काय पाऊल उचलले? काय प्रतिसाद दिला? मात्र त्यांच्या "जेटली केंद्रित' शेरेबाजीने किमान पंधरा मिनिटे यावरून गदारोळ झाला.

जेटली म्हणाले, की "एचएसबीसी' बॅंकेतील खात्यांपुरताच हा प्रश्‍न मर्यादित आहे. त्याचे जे तपशील सरकारला मिळाले त्या आधारे परदेशांत काळा पैसा दडविणाऱ्या 628 खातेधारकांची चौकशी केली. यातील काही खात्यांत पैसे ठेवलेले नव्हते. यातील 409 प्रकरणांचा तपास पूर्ण होऊन 837 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

पेपरफुटी प्रकरणी 18 अटकेत
लष्कर भरतीची प्रश्‍नपत्रिका पुणे केंद्रावर फुटल्या प्रकरणी 18 संशयितांना अटक केल्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितले. महंमद अली खान, दिग्विजयसिंह, संजय राऊत यांनी यावर विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले, की यंदा 26 फेब्रुवारीला ही कॉमन एन्ट्रन्स टेस्ट होणार होती. मात्र ठाणे पोलिसांनी घातलेल्या छाप्यांत हा पेपर फुटल्याचे उघड झाले. प्रश्‍नपत्रिका छापायला जातात तेथूनच या प्रश्‍नपत्रिकेला पाय फुटल्याचा संशय आहे. या प्रकाराची चौकशी मेजर जनरल पदावरील लष्करी अधिकाऱ्यामार्फत, तसेच सीबीआयमार्फतही केली जाणार आहे. मात्र यात लष्कराची गुप्तचर यंत्रणा साफ अपयशी ठरली नाही का, या राऊत यांच्या प्रश्‍नाला भामरे यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. ही प्रश्‍नपत्रिका पुण्याबरोबरच तत्कालीन संरक्षणमंत्र्यांचे गोवा व गृह खाते हाताळणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे गाव नागपूर या तीन ठिकाणांहून फुटल्याचे राऊत यांनी सांगितले.

Web Title: ram jethmalani and Rajya Sabha