दलितांवरील अत्याचाराच्या घटना निंदनीय : आठवले

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 मे 2017

दरम्यान देशभरातील वाढत्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर "तीन साल बेमिसाल' हा उत्सव साजरा करावा का, या प्रश्‍नाला आठवले यांनी बगल दिली

नवी दिल्ली - योगीराज असलेल्या उत्तर प्रदेशात सहारनपूरमध्ये 45 दलित कुटुंबांची घरेदारे जाळणे व हरियानात दलितांच्या लग्न वरातीवर पाशवी हल्ला होणे आदी घटना निंदनीय व राज्यघटनेच्या विरोधात आहेत, अशा शब्दांत मोदी सरकारचे समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिला.

याबाबत गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करून दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी करू, असेही ते म्हणाले. दरम्यान देशभरातील वाढत्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर "तीन साल बेमिसाल' हा उत्सव साजरा करावा का, या प्रश्‍नाला आठवले यांनी बगल दिली.

आठवले म्हणाले, ""देशातील विविध राज्यांत दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये वर्षाला 45 हजार इतकी वाढ झाली आहे. सर्वाधिक अत्याचार उत्तर प्रदेश, बिहार व हरियाना या तीन राज्यांत होतात व महाराष्ट्रही यात आठव्या क्रमांकावर आहे.'' या चारपैकी तीन राज्यांत भाजपचीच सरकारे आहेत, असे सांगताच आठवले यांनी आपण संबंधितांशी चर्चा करू, असे सांगितले.

Web Title: Ramdas Athwale condemns attack on Dalits