'पोलिसी खाक्‍या'मुळे गांभीर्याचा विचका!

'पोलिसी खाक्‍या'मुळे गांभीर्याचा विचका!

नवी दिल्ली - एक पद एक निवृत्तिवेतन योजना (ओआरओपी) न मिळाल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येचे प्रकरण केंद्र सरकारला महागात जाण्याची चिन्हे आहेत. मृत सैनिकांच्या कुटुंबीयांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी भेटू दिले नाही आणि सिसोदिया व गांधी यांना प्रतिबंधक उपाय म्हणून ताब्यात घेतले, तर केजरीवाल यांच्या मोटारीभोवती वेढा घालून ती रोखून ठेवली. तसेच सैनिकाच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी स्थानबद्ध करून विरोधी पक्षांच्या हातात अक्षरशः कोलित दिले आहे. या कुटुंबीयांना भेटल्याबद्दल गांधी यांना पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राम मनोहर लोहिया रुग्णालय, कॅनॉट प्लेसजवळचे लेडी हार्डिंग्ज रुग्णालय, संसदमार्ग पोलिस ठाणे आणि मंदिर मार्ग पोलिस ठाणे ही आजच्या एका मागून एक घडलेल्या नाट्यमय घटनांची स्थाने होती. ग्रेवाल यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणले; परंतु डॉक्‍टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले होते. त्यामुळे त्यांचे शवविच्छेदन अनिवार्य होते. दरम्यान, ग्रेवाल यांचे कुटुंबीय लोहिया रुग्णालयात असल्याचे समजल्याने राहुल गांधी आणि सिसोदिया त्यांना भेटण्यासाठी तेथे पोचले. सिसोदिया यांनी प्रवेश मिळविला आणि ते कुटुंबीयांना भेटून परतत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तोपर्यंत राहुल गांधी तेथे पोचले. पोलिसांनी त्यांना दरवाज्यावरच अडविले. तेथे राहुल आणि पोलिस अधिकाऱ्यांची बोलाचाली झाली. वरिष्ठ पोलिस अधिकारी एम. के. मीणा यांनी तर चक्क एखाद्या राजकीय नेत्यासारखे भाषण करून ते रुग्णालयात कोणाला राजकारण करू देणार नाहीत. राहुल गांधी यांना येथे येऊन रुग्णसेवा विस्कळित केली जाऊ दिली जाणार नाही, वगैरे वक्तव्ये त्यांनी केली. त्याने वातावरण काहीसे बिघडले. राहुल गांधी यांनी तेथे धरणे सुरू केल्यावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात नेले.

यानंतर काही वेळाने गांधी यांना सोडण्यात आले. लेडी हार्डिंग्ज रुग्णालयात शवविच्छेदनाची सोय असल्याने तेथे ग्रेवाल यांचा मृतदेह पाठविण्यात आला होता. त्यामुळे कुटुंबीयही तेथे असल्याचे समजल्यावरून राहुल तेथे पोचले. पण ते तेथे नव्हते. राहुल गांधी यांना पोलिसांनी पुन्हा पकडले आणि संसद मार्ग पोलिस ठाण्यात ते त्यांना घेऊन गेले. तोपर्यंत ग्रेवाल यांचा मुलगा आणि इतर नातेवाइकांना पोलिस संसद मार्ग ठाण्यात घेऊन आले होते. राहुल त्यांना तेथे पोलिसांसमोर भेटले. यांना पकडून का ठेवले आहे, अशी विचारणा त्यांनी केली असता पोलिसांनी, त्यांना ताब्यात ठेवण्याचे आदेश असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर राहुल गांधी यांनी आपल्याला अटक करा आणि या लोकांनाही अटक करा, असे सांगितले. परंतु पोलिसांनी राहुल गांधी यांना तेथून बाहेर जाण्यास सांगितले.

तोपर्यंत पोलिसांनी पुन्हा राहुल गांधी यांना संसद मार्ग ठाण्यातून तिलक मार्ग पोलिस ठाण्यात नेले. दरम्यानच्या काळात राहुल गांधी यांच्या पाठोपाठ पोचलेले राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभा सदस्य ज्योतिरादित्य शिंदे, मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, अहमद पटेल हे नेतेही तेथे पोचले. परंतु पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागली आणि हा जमावही तिलक मार्ग पोलिस ठाण्यात पोचला.

सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार ग्रेवाल यांच्या मुलास ग्रेवाल यांनी लिहिलेले आत्महत्येपूर्वीचे पत्र राहुल गांधी यांना द्यायचे होते आणि पोलिसांनी त्यास मज्जाव केला होता. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून "ओआरओपी' योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींकडे लक्ष वेधले होते व त्या पत्राची सर्वत्र दखल घेतली होती. त्यानंतर लगेचच ही घटना घडल्याने या प्रकरणास राजकीय रंग मिळणे क्रमप्राप्त होते. ग्रेवाल यांच्या मुलाने पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचे जाहीरपणे सांगितल्याने पोलिसांना तोंड दाखवणे अवघड झाले.
राहुल गांधी यांच्याप्रमाणेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही संसद मार्ग पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवलेल्या ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाऊ लागले असता पोलिसांनी काही अंतर अलीकडेच त्यांच्या मोटारीभोवती कडे करून अडवून ठेवले. त्यांनी तेथूनच वार्ताहरांशी बोलताना मोदी सरकारची ही दादागिरी आहे आणि एका लोकनियुक्त मुख्यमंत्र्यालाही पोलिसांकरवी अडविले जाते ही शरमेची आणि हुकूमशाहीची गोष्ट असल्याची टीका केजरीवाल यांनी केली.

काय काय घडले?
- "ओआरओपी'संबंधी जंतर-मंतरवर निदर्शने करणारे माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांची विष पिऊन आत्महत्या
- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी माजी सैनिक कल्याण विभागाकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती मागविली
- रामकिशन यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पोलिसांच्या ताब्यात
- कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही रुग्णालयाजवळच ताब्यात घेऊन दिल्लीच्या मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर सोडून दिले
- नवीन भारत घडत आहे भैया...अशी राहुल गांधी यांची खोचक टीका; कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, आमदार किरण चौधरीदेखील ताब्यात
- राहुल गांधींना ताब्यात घेतल्याबद्दल लखनौमध्ये कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेचे दहन
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रामकिशन यांच्या कुटुंबाला पोलिसांनी भेट नाकारली
- मोदींच्या राज्यात शेतकरी आणि जवान दोन्ही आत्महत्या करत असल्याची केजरीवाल यांची टीका; "आप' कार्यकर्त्यांची जंतर-मंतरवर निदर्शने
- माजी सैनिकाच्या कुटुंबाची भेट घेण्यापासून रोखणे हे दुर्दैवी असल्याचे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मत
- सरकारकडून "ओआरओपी'ची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे वडिलांनी फोन करून सांगितले; आत्महत्या केलेल्या माजी सैनिकाच्या मुलाची प्रतिक्रिया

"ओआरओपी'ची अंमलबजावणी केल्याचे मोदी खोटे बोलले. "ओआरओपी'ची अंमलबजावणी झाली असती, तर रामकिशन यांनी आत्महत्या का केली असती? मोदीजी, सैनिकांची माफी मागा.
- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री

पंतप्रधानांना पुन्हा एकदा विनंती करतो, की जवानांना त्यांच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागू नये. ओआरओपीची अर्थपूर्ण मार्गाने अंमलबजावणी केलीच पाहिजे.
- राहुल गांधी, कॉंग्रेस उपाध्यक्ष

मी देशासाठी प्राणत्याग करतोय...
राम किशन ग्रेवाल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे आढळले आहे. त्या चिठ्ठीत त्यांनी "मी देशासाठी आणि सहकारी सैनिकांसाठी प्राण त्याग करतोय' असे लिहिले आहे. ग्रेवाल आपल्या काही सहकाऱ्यांसह संरक्षण मंत्रालयाकडे निवेदन देण्यासाठी दिल्लीत आले होते. या निवेदनाच्या मागील बाजूवर त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. ग्रेवाल यांनी विषप्राशन करण्यापूर्वी मुलाशी संभाषण केले होते. त्या वेळीही त्यांनी मी विषप्राशन केले असून, "ओआरओपी'साठी प्राणत्याग करत असल्याचे मुलाला सांगितले होते. हरियानातील भिवानी येथील असलेल्या ग्रेवाल यांनी आर्मी अँड डिफेन्स सिक्‍युरिटी कोअरमध्ये सुमारे 30 वर्षे सेवा केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com