गायत्री प्रजापतींना बलात्कारप्रकरणी लखनौमध्ये अटक

पीटीआय
बुधवार, 15 मार्च 2017

एका 16 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करीत तिच्या आईवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रजापती यांच्यावर आरोप आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशातील मावळत्या राज्य सरकारमधील मंत्री व बलात्कार प्रकरणातील आरोपी गायत्री प्रजापती यांना लखनौमधून अटक करण्यात आली आहे.

समाजवादी पक्षाचे नेते प्रजापती यांच्याभोवती लखनौ पोलिसांनी मंगळवारपासून फासे आवळण्यास सुरवात केली होती. पोलिसांनी मंगळवारी आधी प्रजापती यांच्या तीन साथीदारांना अटक केली असून, प्रजापतींच्या दोन्ही मुलांची व पुतण्याची चौकशी करून त्यांचा माग काढला. 

लखनौमधील मध्यवर्ती भागातील हजरतगंज परिसरातून हे अटकसत्र सुरू करण्यात आल्याचे लखनौचे पोलिस महानिरीक्षक ए. सतीश गणेश यांनी सांगितले. फरार प्रजापती यांचा बचाव केल्याबद्दल समाजवादी पक्षावर केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी टीका केली. या प्रकरणी केवळ कायद्याने निर्णय होईल. प्रजापती यांनी स्वतःहून न्यायालयासमोर हजर व्हावे, असे ते म्हणाले. 

"राजकीय पक्षसुद्धा प्रजापतींना संरक्षण देत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे. याप्रकरणी निर्देश देण्याचे अधिकार केवळ न्यायालयाला आहे. त्यांनी स्वतःहून न्यायालयात हजर होऊन पुढील कारवाईला सामोरे जावे," असे गंगवार यांनी सांगितले. 

एका 16 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करीत तिच्या आईवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रजापती यांच्यावर आरोप आहे. सध्या ही मुलगी येथील 'एम्स' रुग्णालयात डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली राहत आहे. कोणालाही तिला भेटण्यास मज्जाव आहे. आजही ही मुलगी रात्री शांतपणे झोपू शकत नाही. रात्री-अपरात्री मध्येच दचकून उठते व तिच्या वॉर्डमधून पळून जाण्याचा प्रयत्न करते. प्रजापतींचे लोक तिला रात्री शोधत येतील, अशी भीती तिला सतावते. प्रजापती यांना आता या प्रकरणात शिक्षा व्हावी आणि आईला न्याय मिळावा, अशी तिची प्रामाणिक इच्छा आहे. प्रजापती यांना आता कारागृहात पाहण्याची तिची इच्छा असल्याचे तिने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 
 

Web Title: rape accused Samajwadi Party leader Gayatri Prajapati arrested from Lucknow