'मोदींच्या फोटोला बुटाने मारा'; बिहारच्या मंत्र्याचे वक्तव्य

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला बुटाने मारण्याचे आवाहन करणारे बिहारमधील मंत्री जलील मस्तान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला बुटाने मारण्याचे आवाहन करणारे बिहारमधील मंत्री जलील मस्तान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जलील मस्तानही उपस्थित होते. यावेळी त्यांनी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोदींच्या छायाचित्राला बुटाने मारण्याचे आवाहन केले. 22 फेब्रुवारी रोजीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आल्याने ही घटना समोर आली. "नोटाबंदीच्या निर्णयानंतर 50 दिवसांत लोकांचा त्रास कमी झाला नाही तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगण्यास मी तयार असल्याचे मोदी म्हणाले होते', असे वक्तव्य जलील मस्तान करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर व्यासपीठावरील एका खुर्चीवर मोदी यांचे छायाचित्र ठेवले गेले. मस्तान यांनी उपस्थितांना मोदींच्या छायाचित्राला बूटाने मारण्याचे आवाहन केला. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मोदींच्या छायाचित्राला बूट आणि चपलेने मारल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

जलाल मस्तान यांच्या वक्तव्यावरून बिहारच्या विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी जलाल मस्तान यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर मस्तान यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. मात्र, जोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात येत नाही, तोपर्यंत विधानसभेचे कामकाज चालू देणार नसल्याचे बिहार भाजपने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही जलाल मस्तान यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

Web Title: report video shows bihar min asking crowd to beat pm photo with shoes