तो सध्या काय खातोय?? 

रोहन नामजोशी
बुधवार, 11 जानेवारी 2017

भारताच्या सर्व सीमांचे रक्षण करणारा सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) हा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. तेथील एका जवानानी हलाखीची परिस्थिती एका व्हिडियोद्वारे सर्व देशासमोर पोहोचविली आणि देशभर खळबळ माजली. मग नेहमीप्रमाणे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. 

भारताच्या सर्व सीमांचे रक्षण करणारा सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) हा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. तेथील एका जवानानी हलाखीची परिस्थिती एका व्हिडियोद्वारे सर्व देशासमोर पोहोचविली आणि देशभर खळबळ माजली. मग नेहमीप्रमाणे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. 

सैन्यदल हा प्रत्येक नागरिकाचा एक हळवा कोपरा असतो. ज्या घरातला सदस्य सैन्यदलात आपली सेवा देत असतो, त्यांना समाजात एक वेगळे स्थान असते. त्यांच्याकडे एका विशिष्ट आदराने बघितले जाते. विशेषत: सीमेवर लढणाऱ्या जवानावविषयी एक वेगळ्या प्रकारची आस्था समाजात असते. मग अशा वेळी एखादा तेजबहाद्दूर करपलेली पोळी दाखवतो त्यावेळी सच्च्या भारतीयाचे हदय करपून न निघाले तरच नवल. 

माझा एक भाऊ सैन्यात आहे. सर्जिकल स्ट्राईक हा मागच्या वर्षी देशाला नव्याने कळलेला पण परवलीचा शब्द झाला होता. त्या शब्दावर, कृतीवर वादविवाद, संवाद झाले पण हा जेव्हा त्याच सीमेवर असल्याचे कळले तेव्हा मात्र मी हादरलो. मागच्या महिन्यात त्याची भेट झाली. अर्थातच सर्जिकल स्ट्राईक बद्दल मोठी चर्चा झाली. मग थोड्यावेळाने बोलता बोलता सांगितलं की इतकं असलं तरी सैनिकांना अजूनही चांगल्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्याला 22 प्रकारचे गणवेश वापरावे लागतात पण त्यासाठी मिळणारे कापड निकृष्ट दर्जाचे असते. त्यासाठी मिळणारा भत्ता देखील कमी असतो. बुटांचा दर्जा देखील चांगला नसतो. मग सैन्यात राहण्याची प्रेरणा काय असे विचारल्यावर म्हणाला की,""आज भारतात जितके सैनिक आहे त्यांच्यात देशभक्ती आहे. देशासाठी काहीतरी करावे ही पुसटशी इच्छा का होईना पण ती घेऊन ते सैन्यात येतात म्हणून बरं चाललंय'' नंतर मी काही फार बोलूच शकलो नाही. हल्ली नोटांच्या रांगेत उभे राहून देशभक्ती जिथे तोलली जाते त्या देशातले खऱ्या देशभक्तांची व्यथा कोणी ऐकतंय का? 
आज तेजबहाद्दूरने सैन्याची ही अवस्था आणताच त्याच्यावर नको नको ते आरोप केले गेले. आपल्या संस्थेतल्या माणसाने संस्थेवर बोट दाखवले की, त्याला अलगद बाजूला करायची ही पद्धतच आहे. मग बीएसएफ तरी त्याला कसा अपवाद असेल? म्हणे तो मद्यपी आहे. जर तो मद्यपी आहे तर त्याचे पोस्टिंग सीमेवर का केले गेले? एक वेळेस आपण मानू की तो खोटं बोलतोय पण अन्न तर खोटं बोलत नाही ना. कोणीही शहाणा माणूस त्या अन्नाचा दर्जा सांगू शकेल. त्याचे काय? केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणी"चौकशीचे' आदेश दिले पण आज त्या तेजबहाद्दूरची काय अवस्था असेल?? आता सतत कारवाईची टांगती तलवार त्याच्या डोक्‍यावर असेल. त्याला प्लंबरचे काम दिल्याच्या बातम्या येताहेत. म्हणजे त्याची वाताहत सुरू झाली आहेच. काही वाहिन्यांना मुलाखत देतांना माझ्याकडून चुका झाल्या आहेत, पण त्यातून तावून सुलाखून मी देशाची सेवा करत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. समाजमाध्यमांवर देखील अनेक निवृत्त अधिकार्यांनी तेजबहाददूरच्या तक्रारींमध्ये तथ्य असू शकल्याचे मत व्यक्त केले आहे. तेव्हा त्याने सैन्याच्या खाललेल्या मिठाला किती जागला यापेक्षा"तो सध्या काय खातोय' याची चौकशी होणे जास्त महत्त्वाचे आहे. 

हा मुद्दा देखील इतर समस्यांसारखा दोन तीन दिवस चर्चेत राहील आणि सगळे आपापल्या कामाला लागतील, पण या कृत्याची शिक्षा त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरुपात मिळत राहील जे अतिशय दुर्देवी आहे. ते होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनीच त्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्‍यक आहे. अन्यथा "भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी' वगैरेचे कोरडे उमाळे येत राहतील, पण तेजबहाद्दूरला मात्र कच्चा पराठाच खावा लागेल.