कोणत्याही समुदायाचे नाव घेतले नाही : साक्षी महाराज

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

नवी दिल्ली : चार बायका करून चाळीस मुलांना जन्म देणारचे लोकसंख्यावाढीला कारणीभूत असल्याचे वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी निवडणूक आयोगासमोर स्पष्टीकरण देताना आपण कोणत्याही विशिष्ट समुदायाला उद्देशून वक्तव्य केले नसल्याचा दावा केला आहे.

चार बायका करून चाळीस मुलांना जन्म देणारचे लोकसंख्यावाढीला कारणीभूत आहेत, असे वादग्रस्त विधान साक्षी महाराजांनी केले होते. त्यावर निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. यासंदर्भात साक्षी महाराज यांनी निवडणूक आयोगासमोर स्पष्टीकरण दिले. त्यांनतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, 'संतांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मी बोलत होतो. ती कोणतीही राजकीय सभा नव्हती. मी कोणत्याही समुदायाचे नाव घेतलेले नाही. वाढती लोकसंख्या ही आपल्या देशासमोरील मोठी समस्या आहे. मी फक्त आपल्याला लोकसंख्या नियंत्रणाची गरज असल्याचे म्हटले आहे. हेच मी निवडणूक आयोगाला सांगितले. मी काहीही चुकीचे बोललो नाही. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायलाच हवे. लोकसंख्या नियंत्रणासाठी कडक कायदे आहेत. महिला या काय बाळ देणाऱ्या मशिन्स नाहीत', असे स्पष्टीकरण साक्षी महाराजांनी दिले.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, आचारसंहिता लागू झाली आहे. प्रचारासाठी धर्माचा वापर करता येणार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर साक्षी महाराजांच्या विधानामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे की नाही, हे पडताळून पाहिले जात आहे.

Web Title: Sakshi Maharaj defiant, denies charge of promoting enmity