"सौनी-2' प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी

महेश शहा
सोमवार, 22 मे 2017

सौनी-2 प्रकल्पाबाबतही जल आयोगाने काही निरीक्षणे नोंदविल्यानंतर गुजरात सरकारने त्यानंतर केलेल्या कामाचा अहवाल पाठविला. त्यानुसार जलस्त्रोत मंत्रालयाने या प्रकल्पाबाबत शिफारस केली आहे

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्‍या सौनी-2 जलसंधारण प्रकल्पाला केंद्रीय जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या प्रकल्पावर केंद्रीय जल आयोगानेच तांत्रिक कारणास्तव आक्षेप घेतल्यानंतर मोदींच्या हस्तक्षेपाची शक्‍यता निर्माण झाल्यानंतर मंत्रालयाने ही मंजुरी कळविली आहे.

नर्मदा नदीचे पाणी सौराष्ट्राला पुरविण्याच्या या प्रकल्पाबाबत पंतप्रधान मोदी आग्रही आहेत. याबाबत आज मंत्रालयाने तत्त्वत: मंजुरी असल्याचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. "सर्व मोठ्या आणि मध्यम जलसंधारण प्रकल्पांचे केंद्रीय जल आयोगाकडून सर्वेक्षण होणे आणि राज्यांनी या आयोगाची निरीक्षणे केंद्र सरकारला सादर करणे ही नियमित प्रक्रिया आहे. प्राथमिक स्तरावरील अहवालानंतर त्यात शिफारसीनुसार बदल होत असतात. सौनी-2 प्रकल्पाबाबतही जल आयोगाने काही निरीक्षणे नोंदविल्यानंतर गुजरात सरकारने त्यानंतर केलेल्या कामाचा अहवाल पाठविला. त्यानुसार जलस्त्रोत मंत्रालयाने या प्रकल्पाबाबत शिफारस केली आहे,' असे निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्‌घाटन
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या (ता. 22) सौनी-2 प्रकल्पाचे बच्छाव गावाजवळ उद्‌घाटन होणार आहे. येथून नर्मदा नदीचे पाणी कच्छमधील कोरड्या पडलेल्या टप्पर धरणात पोचेल. या धरणातून हे पाणी नर्मदेच्या कालव्यांमध्ये जलसंधारणासाठी सोडले जाईल. यामुळे चार लाख नागरिकांना फायदा होणार आहे.