"आसारामविरुद्धचा खटला लवकर निकालात काढा"

टीम ई सकाळ
बुधवार, 12 एप्रिल 2017

आसाराम बापूंचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने 30 जानेवारी सातव्यांदा फेटाळला होता. तसेच, अर्जासोबत खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्याबद्दल आसारामच्या विरोधात नवीन प्राथमिक चौकशी अहवाल (FIR) दाखल करण्यात यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते. 

नवी दिल्ली : सूरत येथील दोन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्याविरोधात सरकारी पक्षाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सूरत न्यायालयाने जलद करावी, तसेच कालमर्यादा निश्चित करून खटल्याचा निकाल लावावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

सरन्यायाधीश जे.एस. खेहर, न्या. डी.वाय. चंद्रचूड आणि न्या. एस.के. कौल यांच्या खंडपीठाने सूरत न्यायालयाला निर्देश देताना सांगितले आहे की, कथित बलात्कार पीडित बहिणींसह सरकारी पक्षाच्या उर्वरित 46 साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत. 
'प्रत्यक्षात जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर साक्षीदारांची तपासणी करण्याचे निर्देश या कनिष्ठ न्यायालयाला दिले आहेत,' असे या खंडपीठाने म्हटले आहे. 

दरम्यान, 'याच प्रकरणातील दोन सरकारी साक्षीदारांची हत्या करण्यात आली आहे,' असे अतिरिक्त महाधिवक्ता (सॉलिसिटर जनरल) तुषार मेहता यांनी सांगितले. मेहता हे गुजरात सरकारच्या बाजूने वकिली करीत आहेत. 

बलात्कार प्रकरणात गडाआड असलेलास्वयंघोषित गुरू आसाराम बापू अद्यापही शिक्षेतून धडा घेत असल्याचे दिसत नाही. कारण, एम्स रुग्णालयात त्यांना तपासणीसाठी नेले असता त्यांनी परिचारिकेचीच छेड काढली होती. तत्पूर्वी, आसाराम बापूंचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने 30 जानेवारी सातव्यांदा फेटाळला होता. तसेच, अर्जासोबत खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्याबद्दल आसारामच्या विरोधात नवीन प्राथमिक चौकशी अहवाल (FIR) दाखल करण्यात यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते. 

भारतीय दंडविधान संहिता 376 (बलात्कार) आणि बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा (पॉक्सो) अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे आसाराम बापूवर दाखल आहेत. मात्र, राजकीय नेते त्यांच्याबद्दल बोलणे टाळतात. दरम्यान, आसाराम बापू यांचे कथित भक्त त्यांच्या खटल्याचा मुद्दा सोशल मीडियामध्ये दररोज 'ट्रेन्ड'मध्ये येण्यासाठी चर्चा घडवून आणत असल्याचे दिसून येते!

नागपूरनजीकच्या फेटरी येथे आसाराम बापूंच्या साधकांचा भव्य आश्रम आहे. येथील आसाराम बापूंच्या आश्रमातील संपत्तीच्या वादातून एका साधकावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. या घटनेमुळे आश्रमातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.