'सेक्स' हा मुलभूत अधिकार: जिग्नेश मेवानी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सेक्स हा संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे. त्यामुळे कोणालाही तुमची व्यक्तिगत बाबींचा उल्लंघन करण्याचा अधिकार नाही.

नवी दिल्ली : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याचा कथित सेक्स व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांकडून त्याच्यावर टीका होत असताना त्याच्या समर्थनार्थ गुजरातमधील दलित समाजाचा नेता जिग्नेश मेवानी पुढे आला आहे. ''सेक्स हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कोणालाही तुमच्या व्यक्तिगत बाबींचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही", असे ट्विट त्याने केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गड समजल्या जाणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला हार्दिक पटेलचे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर त्याच्याविरोधात बंड उभे केले जात आहे. असे असताना राज्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी हार्दिक पटेल याचा कथित सेक्स व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यानंतर संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. या व्हिडिओमुळे हार्दिक पटेलवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हार्दिक पटेलने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला, भारतीय जनता पक्षाची ही घाणेरडी खेळी आहे. मला यातून बदनाम केले जात आहे. मात्र, या व्हिडिओमुळे गुजरातच्या महिलांची बदनामी केली जात आहे. असा आरोपच हार्दिकने केला आहे. 

दरम्यान, हार्दिकच्या बचावासाठी पुढे आलेल्या जिग्नेश मेवानीने म्हटले आहे, की सेक्स हा संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे. त्यामुळे कोणालाही तुमची व्यक्तिगत बाबींचा उल्लंघन करण्याचा अधिकार नाही.