मी आजही महाआघाडीतच - शरद यादव

शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

राज्यातील जनतेने महाआघाडीस कौल दिला होता. ही महाआघाडी तुटण्यास केवळ नितीशकुमारच कारणीभूत आहेत. अकरा कोटी जनतेच्या इच्छा आणि अपेक्षांचा आपण अवमान करू शकत नाहीत

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेत भाजपशी घरोबा करण्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांना पटलेला नाही. नितीश यांच्या निर्णयावर जोरदार टीका करताना यादव यांनी आजदेखील आपण महाआघाडीचाच घटक आहोत असे सांगितले. विधानसभेच्या निवडणुकीतील जनादेशाचा अवमान आपण करू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

यादव सध्या तीन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आले आहेत. येथे जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की मागील निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात राज्यात महाआघाडी आकारास आली होती. प्रत्येक पक्ष आपापल्या अजेंड्यावर निवडणूक लढला होता. पुढे महाआघाडातील एका पक्षाने यू टर्न घेतला. आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी कधीच अशा प्रकारचा बदल पाहिला नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.

नितीशकुमारांमुळे ब्रेकअप
राज्यातील जनतेने महाआघाडीस कौल दिला होता. ही महाआघाडी तुटण्यास केवळ नितीशकुमारच कारणीभूत आहेत. अकरा कोटी जनतेच्या इच्छा आणि अपेक्षांचा आपण अवमान करू शकत नाहीत. लोकांना महाआघाडीकडून खूप अपेक्षा आहेत. नितीश यांनी महाआघाडी तोडून जनादेशाचा अवमान केला आहे. आपणही दीड वर्षे महाआघाडीचाच प्रचार केला होता असेही यादव यांनी सांगितले.

Web Title: sharad yadav bihar politics