उकरलेले मुद्दे 'आप'च्या अंगलट

शेखर गुप्ता
सोमवार, 20 मार्च 2017

गोव्यामध्ये त्यांचा पराभव अपेक्षित समजला जात असताना, पंजाबमध्ये मात्र त्यांच्या विरोधकांना आणि टीकाकारांनाही (माझ्यासह) त्यांच्याकडून अधिक अपेक्षा होती. चाळीस जागा मिळवून ते दुसऱ्या जागा पटकावतील, अशी मला जवळपास खात्री होती.

राज्याकडे केवळ जातीय दृष्टिकोनातून पाहिल्याने आणि जवळपास निष्क्रिय झालेल्या कट्टरतावाद्यांना पुन्हा प्रकाशझोतात आणल्याने आम आदमी पक्षाचा पंजाबमध्ये पराभव झाला. 

पराभव हा अनाथ असतो, हे मानवी इतिहासातील सार्वकालीन सत्य आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पंजाब आणि गोव्यात सामोरे जावे लागलेल्या पराभवाकडे पाहून मला हा वाक्‌प्रचार सुचला. याच दोन राज्यांमध्ये पाय रोवण्याचा "आप'चा इरादा होता. या पक्षाने तर "अंतर्गत सर्वेक्षणा'च्या पुराव्याच्या आधारावर निकालाच्या एक दिवस आधीच दोन्ही राज्यांमध्ये विजयोत्सव साजरा करून नंतर स्वतःला तोंडघशी पाडले होते. 

गोव्यामध्ये त्यांचा पराभव अपेक्षित समजला जात असताना, पंजाबमध्ये मात्र त्यांच्या विरोधकांना आणि टीकाकारांनाही (माझ्यासह) त्यांच्याकडून अधिक अपेक्षा होती. चाळीस जागा मिळवून ते दुसऱ्या जागा पटकावतील, अशी मला जवळपास खात्री होती. त्यांच्यासारख्या "बाहेरच्या' आणि नवख्या पक्षाने खरोखरीच दुसरे स्थान पटकावले; मात्र केवळ वीसच जागा मिळणे आणि तेही विजयोत्सव साजरा केल्यानंतर, ही त्यांची मानहानीच आहे. "आप'च्या पराभवानंतर झालेल्या अनेक तिरक्‍या टिप्पणींपैकी एक म्हणजे, अरविंद केजरीवाल यांचा "विनोद कांबळी' झाला. आधी भल्यामोठ्या बढाया मारायच्या आणि नंतर तोंडावर आपटायचे. 

"आप'चा पराभव का झाला आणि त्यांचे काय चुकले, याचे विश्‍लेषण खूप जणांनी केले आहे. त्यात काही तथ्य असले, तरी त्यांनी पंजाबची अधोगती, बेरोजगारी, युवकांमधील नैराश्‍य आणि नागरिकांचा आत्मविश्‍वास हरवला जाणे या खऱ्या प्रश्‍नांवर लक्ष केंद्रित केले होते, हेही तितकेच सत्य आहे. दुसरे म्हणजे त्यांनी या सर्वांसाठी शिरोमणी अकाली दलाला, विशेषतः बादल कुटुंबाला थेट जबाबदार धरले. "आप'ने खूप आधीच प्रचाराला सुरवात करत सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू केला. त्यासाठी पंजाबमधील बुद्धिमान युवकांना हाताशी धरले. याबरोबरच त्यांनी स्वतः पुढाकार घेत डाव्या आणि उजव्या विचारसरणीतील कट्टरतावाद्यांशी हातमिळवणी केली. कॉंग्रेसचा परंपरागत मतदार असलेल्या दलित समाजाने "आप'कडे पर्याय म्हणून पाहण्यास सुरवात केली होती. विशेष म्हणजे, याच दलित समाजाने कांशीराम पंजाबमधील असूनही बहुजन समाज पक्षाला कधी आपलेसे केले नाही. केजरीवाल हे तुफान गर्दी खेचत होते आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते पाहता या वेळी त्यात वाढ होण्याचीच सर्व चिन्हे होती. 

"आप'ने उच्चशिक्षित, स्मार्ट युवकांना उमेदवारी दिली होती. यांतील अनेकांनी केजरीवालांबरोबर माहिती अधिकार चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. या पक्षाचे राजकारण तीन अक्षरी मंत्रावर आधारलेले होते - क्राय (करप्शन, रिव्हेंज आणि यूथ). हा फॉर्म्युला दिल्लीत यशस्वी ठरला होता. मात्र, पंजाबमध्ये तो अपयशी ठरला. मतदानाच्या दिवसापर्यंत आपला मुद्दा लोकांच्या मनात राहील, असा प्रचार करण्यात त्यांना यश आले नाही. अर्थातच, आपल्या अपयशाला कारणीभूत असलेले आणि "मतदानयंत्रात फेरफार' या कारणाशिवाय अधिक खरे वाटणारे घटक "आप'चे हुशार लोक शोधून काढतीलच. 

पंजाबकडे जातीय दृष्टिकोनातून पाहण्यात "आप'ची घोडचूक झाली. मी माझे शब्द फार विचारपूर्वक वापरत आहे. शिखांची पगडी, भांगडा आणि सुवर्णमंदिर ही पंजाबची लोकप्रिय ओळख आहे; पण हे काही फक्त शिखांचे राज्य नाही. राज्यातील 40 टक्के जनता हिंदू आहे आणि इतर शिखांइतकेच तेही पंजाबीच आहेत. हे लोकसुद्धा शिखांप्रमाणेच गुरुद्वारामध्ये जाऊन अत्यंत भक्तिभावाने प्रार्थना करतात. पंजाबी लोक मनमोकळे असतात आणि इतरांना सामावून घेण्यात त्यांना आनंद वाटतो. मतांसाठी म्हणूनही कोणी बाहेरील व्यक्ती पगडी घालत असेल, तर त्यांना आश्‍चर्य वाटते. ते म्हणतात, हा माणूस बाहेरचा आहे आणि चांगला आहे, हे मला माहीत आहे. मग हा मला प्रभावित करण्यासाठी "फॅन्सी ड्रेस' का घालतो? 

"आप'ने निर्णय घेतला, की त्यांना शीख मतांची गरज आहे आणि त्यानुसारच त्यांनी प्रचारमोहिमेची रचना केली. त्यामुळे पुढील घोडचूक ओघानेच आली. ऐंशीच्या दशकात शिखांच्या मनावर झालेल्या जखमांवरील खपली काढायला त्यांनी सुरवात केली. ऑपरेशन ब्लू स्टार, दिल्लीतील शिखांचे हत्याकांड या मुद्द्यांवर "न्याय' मागण्यास त्यांनी सुरवात केली. यासाठी त्यांनी खलिस्तानच्या आठवणी जपणाऱ्या गटांशीही हातमिळवणी केली. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांना अनिवासी भारतीय शिखांकडून निधी मिळाला. विशेषतः कॅनडामधील, जिथे अद्यापही श्रीमंत गुरुद्वारांमधून खलिस्तानचे स्वप्न रंगविले जाते, शिखांकडून भरभरून मदत घेतली गेली. हे सर्व केवळ शिखांची मते "आप'कडे वळविण्यासाठी केले गेले. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी "आप' आणि निष्क्रिय झालेल्या कट्टरतावाद्यांच्या संबंधांकडे माझे प्रथमच लक्ष गेले. या वेळी विस्मरणात गेलेली अनेक नावे ऐकू येऊ लागली. सुचासिंग छोटेपूर, हरिंदरसिंग खालसा हे पूर्वाश्रमीचे कट्टरतावादी "आप'तर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. हे लोक आता इतर भारतीयांप्रमाणेच देशप्रेमी आहेत, याची मला खात्री असली, तरी त्यांचा इतिहास वेगळा होता. जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे एकेकाळी निकटचे सहकारी असलेले मोहकामसिंग यांनीही "आप'ला पाठिंबा दिला होता. त्यांच्या गाडीचाही क्रमांक ब्लूस्टार आणि भिंद्रनवाले यांच्या मृत्यूच्या तारखेची आठवण करून देणारा होता. हे सर्व असतानाच कॅनडामधून मिळणाऱ्या निधीमुळे इतर हिंदू मतदारांसमोर चित्र स्पष्ट झाले आणि त्यांनी भीतीच्या छायेत जात "आप'विरोधी मतदान केले. 

2014 मध्ये, योगेंद्र यादव हे "आप'मध्ये असताना त्यांनी यावर भूमिका स्पष्ट केली होती. पूर्वीच्या कट्टरतावाद्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून अहिंसक आणि लोकशाही मार्गाने जुने वाद मिटविण्याचा हा उपाय असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, हिंदू असो वा शीख, 1979 ते 1994 या काळात संघर्षाचा फटका बसलेल्या सर्व पंजाबी नागरिकांना या उपायाची अंमलबजावणी होईपर्यंत संयम नव्हता. शब्द पसरू लागला, की पंजाबमध्ये सरकार आणायचे हे खलिस्तानवादी (विशेषतः कॅनडावासी) लोकांचे ध्येय नाही. तर, "आप'सारख्या बाहेरच्या लोकांना हाताशी धरून अकालींना नेस्तनाबूत करायचे आणि त्यानंतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीवर नियंत्रण मिळवायचे, हा त्यांचा उद्देश आहे. एकदा त्यांनी राज्यातील गुरुद्वारांवर नियंत्रण मिळविले, की पुन्हा एकदा ऐंशीच्या दशकातील संघर्षपटाचा पुढील भाग सुरू होणार, असे लोकांना वाटू लागले. कोणत्याच पंजाबी नागरिकांना, शिखांनाही, हा संघर्षपट पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती. जुन्या घटना विसरल्या जाणार नसल्या, तरी त्या मानसिक धक्‍क्‍यातून बाहेर येऊन सामान्य जीवन सुरू करण्यास अनेक वर्षांचा कालावधी गेला होता. कॉंग्रेसच्या राज्यातील जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि अकाली दलाची खराब परिस्थितीही त्याला कारणीभूत आहे. त्यामुळेच, "आप'ने भूतकाळ उकरून काढण्यापेक्षा चांगल्या भविष्याची स्वप्ने दाखविली असती, तर त्यांना अधिक चांगली कामगिरी करता आली असती. 
(अनुवाद : सारंग खानापूरकर)