‘सहारा’ला पाच हजार कोटी भरण्याचा आदेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

सहारा समुहाने लिलावासाठी 15 मालमत्तांची यादी न्यायालयास दिली आहे. यातील 13 मालमत्तांची विक्री करून एकूण रु.पाच हजार कोटी मिळू शकतील असे सहाराच्या वतीने सांगण्यात आले

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना दिलासा देत पॅरोलमध्ये 17 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. मात्र 17 एप्रिलच्या आधी रु.पाच हजार कोटी जमा करण्याचे आदेश दिले आहेत. पाच हजार कोटींचा निधी उभारण्यासाठी न्यायालयाने मालमत्ता विकण्याची रॉय यांना मुभा दिली आहे.

सहारा समुहाचे सुब्रतो रॉयच्या पॅरोलसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आहे. आज झालेल्या सुनावणीत सहारा समुहाने लिलावासाठी 15 मालमत्तांची यादी न्यायालयास दिली आहे. यातील 13 मालमत्तांची विक्री करून एकूण रु.पाच हजार कोटी मिळू शकतील असे सहाराच्या वतीने सांगण्यात आले. 10 एप्रिलपर्यंत पैसे भरण्याचा आदेश देण्यात आला असून रु.पाच हजार कोटींपैकी काही रक्कम जमा झाल्यास मालमत्तेच्या लिलावासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाईल असेही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान सांगितले.

समुहाकडे एकुण 24,029.73 कोटी रुपयांचे दायित्व होते. त्यापैकी सहारा सेबीच्या खात्यात आतापर्यंत 11,001.40 कोटी रुपयांची रक्कम भरली आहे.