अर्थसंकल्पावर तातडीने सुनावणीस कोर्टाचा नकार

यूएनआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

या काळात पाच राज्यांतील निवडणुका होणार असल्यामुळे सरकारला अर्थसंकल्प सादर करण्यापासून रोखण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. विरोधी राजकीय पक्षांनीही निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविला आहे

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर सादर करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. या प्रकरणी आम्हाला कोणतीही घाई नाही. ज्या वेळी हे प्रकरण सुनावणीला येईल, त्या वेळी त्यावर निर्णय दिला जाईल, असे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले.

एम. एल. शर्मा या वकिलाने ही याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकार 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या काळात पाच राज्यांतील निवडणुका होणार असल्यामुळे सरकारला अर्थसंकल्प सादर करण्यापासून रोखण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. विरोधी राजकीय पक्षांनीही निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविला आहे.