मी राजीनामा सादर केला, पण पंतप्रधान म्हणाले... : सुरेश प्रभू

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

या दोन्ही रेल्वे अपघातांची मी नैतिक जबाबदारी स्वीकारतो. या दोन्ही दुर्घटनांमुळे मला खूप दुःख झाले आहे. या दुर्घटनांमध्ये अनेकांचे जीव गेले असून, अनेक जण जखमी आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या न्यू इंडियामध्ये सक्षण आणि आधुनिक रेल्वे होण्याची आवश्यकता आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात आठवडाभरात झालेल्या दोन रेल्वे दुर्घटनांची जबाबादारी स्वीकारत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केला. पण, पंतप्रधानांनी मला थांबा असा संदेश दिल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात उत्कल एक्स्प्रेसपाठापोठ कैफियत एक्स्प्रेसला आज (बुधवार) अपघात झाला आहे. या दोन्ही अपघातांची जबाबादारी स्वीकारत प्रभू यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा सादर केला. प्रभू यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. प्रभू यांच्या राजीनाम्याबाबत विरोधी पक्षांकडून सतत मागणी करण्यात येत आहे. आजच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनीही राजीनामा दिला आहे.

प्रभू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, या दोन्ही रेल्वे अपघातांची मी नैतिक जबाबदारी स्वीकारतो. या दोन्ही दुर्घटनांमुळे मला खूप दुःख झाले आहे. या दुर्घटनांमध्ये अनेकांचे जीव गेले असून, अनेक जण जखमी आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या न्यू इंडियामध्ये सक्षण आणि आधुनिक रेल्वे होण्याची आवश्यकता आहे. रेल्वे त्याच मार्गावर आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये रेल्वेच्या प्रगतीसाठी खूप काम केले आहे.