ताजमहाल एक सुंदर कब्रस्तान: मंत्री विज यांचे ट्विट 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

ताजमहाल ही वास्तू म्हणजे एक सुंदर कब्रस्तान आहे. हा स्थापत्य कलेचा कितीही सुंदर नमुना असला तरीही त्याची प्रतिकृती लोक घरात ठेवणे अशुभ मानतात, असे ट्‌विट हरियानाचे विज्ञान तंत्रज्ञानमंत्री अनिल विज यांनी केले आहे. 

चंदीगड : जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेले ताजमहाल सध्या चर्चेत आहे. हरियानाचे विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री अनिल विज यांनी या वादात उडी घेतली आहे.

ताजमहाल ही वास्तू म्हणजे एक सुंदर कब्रस्तान आहे. हा स्थापत्य कलेचा कितीही सुंदर नमुना असला तरीही त्याची प्रतिकृती लोक घरात ठेवणे अशुभ मानतात, असे ट्‌विट हरियानाचे विज्ञान तंत्रज्ञानमंत्री अनिल विज यांनी केले आहे. 

त्यांच्या ट्‌विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. याआधी भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवर लागलेला डाग आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे अनेकजण नाराज झाले होते. उत्तर प्रदेशातील पर्यटनस्थळाच्या यादीतून ताजमहालचे नाव योगी आदित्यनाथ सरकारने हटवले आणि यावरून वाद सुरू झाला. शहाजहान याने आपल्या वडिलांना तुरुंगात डांबले, त्याला भारतातून हिंदूंचे अस्तित्व मिटवायचे होते. असे लोक आपल्या इतिहासाचा भाग कसे असू शकतात? असा प्रश्न करत ताजमहालाचे नाव हटवण्यात आले. लवकरच औरंगजेब आणि इतर मुघल बादशहांचा इतिहासही पाठ्यपुस्तकातून वगळणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केले. 

भाजप नेते विनय कटियार यांनीही ताजमहाल हे महादेवाचे मंदिर आहे, असा दावा केला. ताजमहालाचे नाव शेकडो वर्षांपूर्वी "तेजो महाल' होते असे कटियार यांनी म्हटले आहे. इतिहासकार पी. एन. ओक यांच्या पुस्तकाचाही दाखला त्यांनी यासाठी दिला होता. 

Web Title: Taj Mahal a ‘beautiful graveyard’: Haryana minister Anil Vij