अबू दुजानाचा मृतदेह भारत पाकिस्तानकडे सोपविणार ?

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

अबू दुजाना हा पाकिस्तानचा नागरिक होता, त्यामुळे पाकनेच त्याचा मृतदेह ताब्यात घेणे योग्य ठरेल

श्रीनगर - दक्षिण काश्‍मीरमध्ये भारतीय लष्करासोबत झालेल्या चकमकीत ठार करण्यात आलेला "लष्करे तैय्यबा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या अबू दुजाना याचा मृतदेह पाकिस्तानकडे सोपविण्याचा भारत सरकारचा विचार आहे. यासाठी जम्मू काश्‍मीर पोलिस केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माध्यमातून पाकिस्तानी उच्चायुक्तांशी संपर्क साधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

एखाद्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तालयास भारत सरकारने सूचना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

" पोलिस मुख्यालयास आपण स्वतंत्र पत्र लिहिणार आहोत, पुढे हा मुद्दा गृहमंत्रालयाच्या माध्यमातून पाकिस्तानी उच्चायुक्तांसमोर मांडण्यात येईल. अबू दुजाना हा पाकिस्तानचा नागरिक होता, त्यामुळे पाकनेच त्याचा मृतदेह ताब्यात घेणे योग्य ठरेल,'' असे काश्‍मीर खोऱ्याचे पोलिस महासंचालक मुनीर खान म्हणाले.