तनिष्का व्यासपीठ हा स्तुत्य उपक्रम! - मेनका गांधी

तनिष्का व्यासपीठ हा स्तुत्य उपक्रम! - मेनका गांधी

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील क्रमांक एकचे वृत्तपत्र असलेल्या "सकाळ'ने महिला सबलीकरणासाठी तनिष्का व्यासपीठ सुरू केले आहे. या महिला दुष्काळ निवारणासह राज्याच्या अनेक योजनांत अग्रभागी आहेत.

स्वतःच्या प्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेत त्या सहभागी होतात, अशी माहिती केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांनी दिल्लीत पत्रकारांना दिली. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.

या खात्याच्या विशेष सल्लागार नंदिता दास यांनी या संपूर्ण उपक्रमाबद्दल खात्याला माहिती देणे आवडेल, असे सांगितले. महिलांच्या मनोविश्‍वात गेल्या काही वर्षांत अचंबित करणारे बरेच बदल झाले. त्याची दखल घेत त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी या खात्यालाही नव्याने मार्ग आखावे लागतील, असे त्या म्हणाल्या. खाप पंचायतीसारख्या जुनाट कल्पना या देशातील महिला कालबाह्य ठरवतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक खासदाराने त्याच्या मतदारसंघातील बालसुधारगृहे आणि आश्रमशाळांना भेट द्यावी, असे आवाहन मी व्यक्तीशः प्रत्येकाला केले होते; परंतु फारसा प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत मंत्री मनेका गांधी यांनी या वेळी व्यक्त केली. भारतातील निवडक पत्रकार महिलांशी खात्याच्या विविध योजना आणि आव्हानांबद्दल त्या बोलत होत्या. महाराष्ट्रातील आश्रमशाळांत सुरू असलेल्या लैंगिक शोषणाबद्दल सर्व संबंधितांनी कोणतीही भीती न बाळगता माझ्याकडे तक्रार करावी, त्याची योग्य ती दखल घेऊन न्याय देण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

महाराष्ट्रातील परिस्थिती समाधानकारक असली, तरी आश्रमशाळांत सुरू असलेल्या अन्याय-अत्याचारांबाबत झिरो टॉलरन्स हेच केंद्र सरकारचे धोरण असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांबद्दलच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल करण्यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी काम करत आहे. भारतातील 110 जिल्ह्यांत स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण प्रचंड होते. त्यातील 52 जिल्ह्यांत एका वर्षात हे प्रमाण खूप कमी झाले. तिथे दरहजारी मुलांमागे 810 पर्यंत घसरलेले मुलींचे प्रमाण आता 900 पर्यंत पोचले आहे. 58 जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या, तसेच यंत्रणांच्या समन्वयाअभावी कोणतीही प्रगती होत नव्हती; मात्र तिथे राज्य सरकारने सर्वतोपरी मदत करावी, असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने दिले आहेत. कन्येचा प्रत्येक गर्भ वाचवायला हवा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याला कळवली असल्याचेही गांधी यांनी सांगितले.

परवानगीविनाच बालगृहे सुरू
बालसुधारगृहातील विस्कळितपणा आणि भ्रष्टाचार हा चिंतेचा दुसरा मोठा विषय आहे, असे गांधी म्हणाल्या. या सर्व संस्थांच्या पाहणीची योजना आम्ही हाती घेतली आहे. प्रारंभी संपूर्ण देशात केवळ 200 बालगृहे असल्याची खात्याची माहिती होती. प्रत्यक्षात हा आकडा 900 पेक्षाही जास्त आहे. योग्य परवाने न घेताच बालगृहे सुरू केली जातात, असे आमच्या लक्षात आले. 45 वर्षांत यासंदर्भात कोणतीही पाहणी झाली नव्हती, असे धक्कादायक वास्तव मी या खात्याची मंत्री झाल्यावर समजले, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com