तेजबहादूर यादव बडतर्फीला आव्हान देणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

रेवारी (हरियाना): सीमा सुरक्षा दलाचा बडतर्फ जवान तेजबहादूर यादव त्याच्या बडतर्फीला न्यायालयात आव्हान देण्याच्या विचारात आहे. जवानांना पुरविल्या जाणाऱ्या अन्नाच्या निकृष्ट दर्जाच्या माझ्या तक्रारीची योग्य रीतीने सुनावणी झाली नसल्याचा दावा यादव यांनी केला आहे.

यादव हे मूळचे रेवारी येथील रहिवासी आहेत. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी नियंत्रण रेषेवरील जवानांना पुरविल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार करत व्हिडिओ प्रसारित केला होता. सुरक्षा दलांसाठीच्या न्यायालयाने त्याला काल बडतर्फ केले होते. खोटे आरोप करणे व सेवेवर असताना दोन मोबाईल फोन बाळगणे, या दोन कारणांसाठी त्याला ही शिक्षा देण्यात आली होती.

याबाबत आज यादव म्हणाले, "माझ्या सहकाऱ्यांना मी साक्षीदार म्हणून फोन लावण्याची मागणी केली होती. मात्र, माझा फोन जप्त करण्यात आला व त्यांच्याशी बोलू दिले नाही. माझ्या निवृत्तीचे व पेन्शनची कागदपत्रे मागितली असताना मला बडतर्फ केले, याचा मला धक्का बसला आहे.''

त्यांची पत्नी शर्मिला म्हणाल्या, ""आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात जाणार आहोत. त्यांची वीस वर्षे सेवा झाल्याने त्यांना निवृत्तिवेतन मिळायला हवी.''