पत्नीचे आवाहन नाकारून त्याने पत्करला मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

शेर गुजरीची पत्नी दिलशादाला शोधून चकमक सुरू असलेल्या ठिकाणी आणले गेले. तेथे दिलशादाने ध्वनीक्षेपकाद्वारे तिच्या पतीला जवानांना शरण येण्याचे आवाहन केले. जर शेर गुजरी शरण आला तर त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याची खात्री असल्याचा संदेशही तिने दिला. मात्र पत्नीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत दहशतवाद्याने गोळीबार सुरूच ठेवला.

श्रीनगर (जम्मू-काश्‍मिर) - दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या जोरदार चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. त्यापैकी एका दहशतवाद्याचे प्राण वाचावेत आणि त्याने शरण यावे यासाठी जवानांनी त्या दहशतवाद्याच्या पत्नीला चकमकीच्या ठिकाणी आणले आणि तिच्यामार्फत शरण येण्याचा संदेश पोचविला. मात्र, पत्नीचे आवाहन नाकारून दहशतवाद्याने जवानांच्या दिशेने गोळीबार सुरूच ठेवला. या चकमकीत अखेर त्या दहशतवाद्याचा मृत्यू झाला.

गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी पोलिसांच्या विशेष पथकासोबत पुलवामामधील अवंतीपोरा भागात शोधमोहिम राबविली. त्यावेळी जहॉंगीर गनाई आणि महंमद शफी ऊर्फ शेर गुजरी या दोन दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. त्यानंतर जहॉंगीर गनाईने गोळीबार करत दूर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात तो अपयशी ठरला आणि ठार झाला. त्यानंतर शेर गुजरी या दहशतवाद्याने जवानांच्या दिशेने गोळीबार सुरूच ठेवला. दरम्यान, शेर गुजरी हा स्थानिक नागरिक असल्याने रक्तपात घडू नये आणि त्याला पुन्हा एकदा संधी द्यावी या उद्देशाने त्याने शरण यावे यासाठी जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. शेर गुजरीची पत्नी दिलशादाला शोधून चकमक सुरू असलेल्या ठिकाणी आणले गेले.

तेथे दिलशादाने ध्वनीक्षेपकाद्वारे तिच्या पतीला जवानांना शरण येण्याचे आवाहन केले. जर शेर गुजरी शरण आला तर त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याची खात्री असल्याचा संदेशही तिने दिला. मात्र पत्नीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत दहशतवाद्याने गोळीबार सुरूच ठेवला. अखेर कोणताही पर्याय उरला नसल्याने जवानांसोबतच्या चकमकीत शेर गुजरीचा मृत्यू झाला.