दहशतवाद्यांच्या दरोड्याच्या प्रयत्नात पाच पोलिस हुतात्मा

वृत्तसंस्था
सोमवार, 1 मे 2017

गेल्या 24 तासांत भारतीय सुरक्षा दलांवर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान हुतात्मा झाले. त्यानंतर बॅंकेची रक्कम लुटण्याच्या प्रयत्नांत असलेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस हुतात्मा झाले.

श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील कुलगाममध्ये बॅंकेची रोख रक्कम घेऊन जाणारी गाडी अडवून लुटण्याच्या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांत किमान पाच पोलिस आणि दोन सुरक्षा रक्षक ठार झाले. या पोलिसांच्या हौतात्म्यामुळे दहशतवाद्यांचा कट उधळला गेला. 

बॅंकेच्या निहमा गावातील शाखेमध्ये पैसे भरून ही गाडी पुन्हा कुलगामकडे येत असताना दहशतवाद्यांनी त्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी गाडीवर आणि सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. यात पाच पोलिस हुतात्मा झाले. गोळीबारात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीमही हाती घेण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांची शस्त्रे पळविली. 

गेल्या 24 तासांत भारतीय सुरक्षा दलांवर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान हुतात्मा झाले. त्यानंतर बॅंकेची रक्कम लुटण्याच्या प्रयत्नांत असलेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस हुतात्मा झाले.

'गेले 24 तास जम्मू-काश्‍मीसाठी भयानक होते. आधी दोन जवान हुतात्मा झाले आणि त्यांच्या मृतदेहाची विटंबना झाली. त्यानंतर आता पाच पोलिस आणि बॅंकेच्या दोन कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला,' असे ट्‌विट जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले. गेल्या काही वर्षांपासून दक्षिण काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. पोलिसांवरील या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारली नाही.