बिहार: दुर्गम गावात आढळली इसिसची पोस्टर्स

वृत्तसंस्था
रविवार, 19 मार्च 2017

इसिसची पोस्टर्स लावण्यात आलेले हे गाव दुर्गम भागामधील आहे. तेव्हा या भागामधील नागरिकांच्या मनामध्ये भय निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांकडून ही कृती करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे

पटणा - बिहार राज्यामधील रोहतास जिल्ह्यातील सिक्राउली बिहगा या गावामध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणारे फलक (पोस्टर) लावण्यात आल्याचे आढळून आले आहे.

इंग्रजी भाषेत असलेल्या पोस्टर्समध्ये इसिसचा प्रभाव देशाच्या सर्व भागंमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टर्ससंदर्भात तपासणी करण्यासाठी पोलिस दल व गुप्तचर खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या भागामध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

इसिसची पोस्टर्स लावण्यात आलेले हे गाव दुर्गम भागामधील आहे. तेव्हा या भागामधील नागरिकांच्या मनामध्ये भय निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांकडून ही कृती करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान ही पोस्टर्स जप्त करण्यात आली असून या भागामध्ये अधिक सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.