जवानांनो हुतात्मा होण्याची वाट बघू नका - पर्रीकर

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी आपण अनेक प्रयत्न केले, मोदींनी पुढाकार घेतला. मात्र सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी प्रक्रिया-चर्चा सुरु आहे.

पणजी - देशाच्या शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्य तयार असून, फक्त सरकारकडून परवानगी मिळण्याची वाट सैन्य बघत आहे. जवानांनी हुतात्मा होण्याची वाट न बघता शत्रूला थेट प्रत्युत्तर द्यावे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सीमेजवळ सराव केल्याचे वृत्त आले होते. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतावर टीका करताना भारतीय सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल असे वक्तव्य केले होते. याविषयी बोलताना पर्रीकर यांनी भारताच्या शत्रूबाबत सैन्य तयार असल्याचे वक्तव्य केले आहे.

पर्रीकर म्हणाले, की भारतीय सैन्याचे मनोबल वाढले आहे. देशाच्या शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्य तयार आहे. सैन्याला आम्ही दोन-तीन वेळा परवानगी दिलेली आहे. भारताच्या सीमा सुरक्षित असून, कोणीही घुसखोरीचा प्रयत्न करू शकत नाही. सैन्यानेही हुतात्मा होण्याची वाट न पाहता शत्रूला थेट गोळ्या घालाव्यात. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी आपण अनेक प्रयत्न केले, मोदींनी पुढाकार घेतला. मात्र सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी प्रक्रिया-चर्चा सुरु आहे. आता वातावरण गरम आहे म्हणून प्रक्रिया जरा थंडावली आहे एवढेच. तो सुखरुप आहे. भारत पहिले आक्रमक पाऊल उचलणार नाही. मात्र, सीमेवर समोरून गोळीबार सुरु राहिला तर प्रत्युत्तर देत राहणार. दोन शेजाऱयांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहिले तर चांगलेच आहे पण म्हणून देशाच्या सुरक्षेबाबत तडजोड करणार नाही.