पोखरणमध्ये 'हॉवित्झर' तोफांची चाचणी सुरु

पीटीआय
रविवार, 16 जुलै 2017

एम-777 ए-2 अल्ट्रा लाइट हॉवित्झर तोफा भारत-चीन सीमेवर तैनात करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी या तोफांचा वेग, वारंवारता आणि मारक क्षमता यांची तपासणी करण्यासाठी पोखरण येथे चाचण्या सुरू आहेत

नवी दिल्ली - वजनाने हलक्‍या असलेल्या दोन दीर्घ पल्ल्याच्या हॉवित्झर तोफांची पोखरण येथे चाचणी सुरू असल्याचे लष्करातील सूत्रांनी सांगितले. बोफोर्स गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर तब्बल तीस वर्षांच्या खंडानंतर या तोफा अमेरिकेकडून भारताला मिळाल्या आहेत.

एम-777 ए-2 अल्ट्रा लाइट हॉवित्झर तोफा भारत-चीन सीमेवर तैनात करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी या तोफांचा वेग, वारंवारता आणि मारक क्षमता यांची तपासणी करण्यासाठी पोखरण येथे चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे लष्करातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या तोफा 155 मिमी, 39 कॅलिबरच्या आहेत. पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत अमेरिकेकडून प्रशिक्षणासाठी आणखी तीन तोफा मिळणार आहेत. यानंतर मार्च 2019 पासून 2021 च्या मध्यापर्यंत दर महिन्याला पाच तोफा भारतीय लष्करात दाखल होतील. पाकिस्तान आणि चीनबरोबरील प्रादेशिक वादाच्या पार्श्‍वभूमीवर भारताला हॉवित्झर तोफांची अत्यंत आवश्‍यकता होती.

भारताने 80 च्या दशकात बोफोर्स या स्वीडिश कंपनीकडून हॉवित्झर तोफा खरेदी केल्या होत्या. मात्र या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपानंतर खरेदी रखडली. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारत आणि स्वीडन सरकारमध्ये थेट करार होऊन पाच हजार कोटी रुपयांना 145 हॉवित्झर तोफा खरेदीचा करार करण्यात आला. त्यामुळे जवळपास तीस वर्षांच्या खंडानंतर मे महिन्यात भारताला काही तोफा मिळाल्या. एकूण तोफांपैकी 25 तोफा तयार स्थितीत मिळणार असून उर्वरित तोफांची जुळवणी भारतामध्ये केली जाणार आहे.