'यूपी'त गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या मंत्र्यांचा भरणा

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

सरकारमधील 45 टक्के जणांवर गुन्हे; तसेच 80 टक्के करोडपती

लखनौः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार नुकतेच स्थापन झाले; पण "पार्टी विथ डिफरन्स'चा नारा देणाऱ्या या पक्षाच्या सरकारमधील 44 मंत्र्यांपैकी 45 टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. खून, दंगल अशा कारणांवरून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे एकूण 80 टक्के मंत्री करोडपती आहेत.

"उत्तर प्रदेश इलेक्‍शन वॉच अँड असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने 44 मंत्र्यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचे विश्‍लेषण केले आहे. त्यात ही मंगळवारी माहिती उघड झाली. 47 मंत्र्यांपैकी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासह 44 मंत्र्यांनी प्रतिज्ञापत्र जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, डॉ. स्वतंत्रदेव सिंह व मोहसिन राजा यांनी निवडणूक लढविली नसल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नव्हते. शर्मा हे लखनौचे महापौर होते, तर अन्य दोघे विधानसभा व विधान परिषद अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत दाखल केलेले प्रतिज्ञापत्र अभ्यासण्यात आले.

ज्या मंत्र्यांची पार्श्‍वभूमी गुन्हागारांची आहे, त्यात मौर्य यांचे नाव सर्वांत वर आहे. त्यांच्यावर खुनासह 11 गुन्हे दाखल आहेत. अलाहाबाद दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री नंदगोपाळ गुप्ता नंदी व एस. पी. सिंह बाहगेल यांच्यावर प्रत्येकी सात गुन्हे आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांवर तीन गुन्हे आहेत. उपेंद्र तिवारी व मुझफ्फरनगरमधील दंगल प्रकरणातील आरोपी सुरेश राणा यांच्यावरही सहा गुन्हे दाखल आहेत.

धनवान मंत्री
नंदगोपाळ गुप्ता नंदी हे सरकारमधील सर्वांत श्रीमंत मंत्री ठरले आहेत. 57. 11 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे ते धनी आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील सिद्धार्थनाथ सिंह यांच्याकडे 22 कोटी व सतीश महाना यांच्याकडे 20 कोटींची मालमत्ता आहे. राज्यमंत्री गिरीशचंद्र यादव यांच्याकडे सर्वांत कमी म्हणजे 13 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. अनिल राजबहार व नीलकांत तिवारी हे लखपती मंत्री आहेत. त्यांच्याकडे अनुक्रमे 38 लाख व 35 लाख रुपयांच्या मालमत्तेची नोंद झाली आहे.

शिक्षित मंत्र्यांचे सरकार
प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली मंत्र्यांची शैक्षणिक पार्श्‍वभूमीही तपासण्यात आली. त्यानुसार पदवधीर मंत्र्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले. 37 मंत्री पदवीधर व उच्च शिक्षित आहेत. त्याच वेळी सात मंत्री दहावी व बारावी उत्तीर्ण असल्याची नोंद आहे. 18 मंत्र्यांचे वय 25-50 वर्षांदरम्यान असून 26 मंत्र्यांनी पन्नाशी पार केली असून, त्यांचे वय 51 ते 80 वर्षे आहे.