उत्तर प्रदेशात अखेरच्या टप्प्यातील मतदान सुरु

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

सातव्या टप्प्यात 40 मतदारसंघांचा समावेश आहे. वाराणसीमध्ये पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, मोदींनी येथे तीन दिवस तळ ठोकून मोर्चेबांधणी केली आहे. गेल्या निवडणुकीत पाचपैकी तीन मतदारसंघात भाजप, तर दोन ठिकाणी समाजवादी पक्षाचे (सप) उमेदवार निवडून आले होते.

वाराणसी - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील अंतिम टप्प्यासाठी आज (बुधवार) मतदान होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

सातव्या टप्प्यात 40 मतदारसंघांचा समावेश आहे. वाराणसीमध्ये पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, मोदींनी येथे तीन दिवस तळ ठोकून मोर्चेबांधणी केली आहे. गेल्या निवडणुकीत पाचपैकी तीन मतदारसंघात भाजप, तर दोन ठिकाणी समाजवादी पक्षाचे (सप) उमेदवार निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर येथे चुरस निर्माण झाली असून, यामुळे आज येथील मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. गतवेळी झालेल्या निवडणुकीत 40 जागांपैकी सपने 23, बसपने 5, भाजपने 4, तर कॉंग्रेसने 3 जागांवर विजय प्राप्त केला होता. 

मणिपूरमध्ये आज मतदानाचा अखेरचा दिवस 
इम्फाळ - मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यासाठी आज (ता. 8) मतदान पार पडणार असून, या टप्प्यात मुख्यमंत्री इबोबी सिंह विरुद्ध आयर्न लेडी इरोम शर्मिला यांच्यात लढत होत असल्याने उत्सुकता वाढली आहे. या टप्प्यात 22 मतदारसंघांचा समावेश असून, 1 हजार 151 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. भाजपने निर्माण केलेले आव्हान पाहता गेले 15 वर्ष राज्यात सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असून, जनता कोणाला संधी देणार, याकडे लक्ष लागले आहे.