मोफत स्मार्ट फोन अन्‌ शेतकऱ्यांना कर्जमाफी

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

आम्ही दिलेली आश्‍वासने प्रत्यक्षात आणून दाखवतो. मात्र इतरांना फक्त "मन की बात' करता येते, त्यांना "काम की बात' करता येत नाही.
- अखिलेश यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

सप-कॉंग्रेसच्या संयुक्त जाहीरनाम्यात आश्‍वासनांची खैरात

लखनौ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज सप-कॉंग्रेस आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. सप-कॉंग्रेस आघाडीच्या या संयुक्त जाहीरनाम्यात दहा आश्वासने उत्तर प्रदेशातील जनतेला देण्यात आली असून, आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास आश्‍वासनांची पूर्तता करण्यात येणार असल्याचा शब्द दोन्ही नेत्यांनी दिला आहे.

येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अखिलेश आणि राहुल यांच्या हस्ते आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात दहा मुख्य आश्‍वासने देण्यात आली आहेत. तरुणांना मोफत स्मार्ट फोन, 20 लाख तरुणांना रोजगाराची हमी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, स्वस्त दरात वीज आणि पिकांसाठी नुकसानभरपाई देण्याच्या आश्‍वासनांचा यात समावेश आहे.

त्याचबरोबर पुढील पाच वर्षांत सर्व गावांना वीज, रस्ता आणि पाणी उपलब्ध करून देणे, एक कोटी गरीब परिवारांना एक हजार रुपये निवृत्तिवेतन, शहरी भागातील गरीब नागरिकांसाठी दहा रुपयांत एक वेळचे जेवण, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण, पंचायत निवडणुकीमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आणि नववी ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप करण्यात येईल, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

Web Title: Uttar pradesh: sp-congress manifesto