कायदेशीर प्रकियेनंतर उझमा भारतात परतेल

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

आपण लग्नासाठी नव्हे तर, नातलगांना भेटण्यासाठी येथे आलो होतो. मात्र, आपल्याला बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पाडले. विवाहानंतर आपला शारीरिक छळ करण्यात आला, असा आरोप उझमाने आपल्या याचिकेद्वारे केला आहे

इस्लामाबाद - पाकिस्तानी नागरिकाशी विवाह केल्यानंतर शारीरिक छळाचा आरोप केलेल्या उझमा या भारतीय महिलेस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतात परत पाठविण्यात येणार असल्याचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

भारतीय उच्चायुक्तालयाने उझमा हिचा दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबाची प्रत व अन्य कागदपत्रे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे सादर केली आहेत. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच उझमा मायदेशी परतेल, असे माध्यमांनी म्हटले आहे. उझमाने काल (ता. 8) इस्लामाबादमधील न्यायालयात आपल्या पतीविरोधात याचिका दाखल केली आहे.

आपण लग्नासाठी नव्हे तर, नातलगांना भेटण्यासाठी येथे आलो होतो. मात्र, आपल्याला बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पाडले. विवाहानंतर आपला शारीरिक छळ करण्यात आला, असा आरोप उझमाने आपल्या याचिकेद्वारे केला आहे. यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पती ताहीर व विवाह लावून देणाऱ्या मौलवीस नोटीस पाठवून पुढील सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

उझमाचा पती ताहीर याने दोन दिवसांपूर्वी आपल्या पत्नीला भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता.

Web Title: Uzma to return shortly