देश म्हणजे काय?

देश म्हणजे काय?
देश म्हणजे काय?

सध्या संपूर्ण भारत भर देश भक्तीचे मेसेज फिरत आहेत. त्याला कारण ही तसेच महत्त्वाचे आहे ते म्हणजे पाचशे-हजार रूपयांचा नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या आणि संपूर्ण देशभर जनता चलना अभावी त्रस्त झाली. परंतु याविषयी रोष कसा व्यक्त करणार हे कोणालाही समजत नाही कारण काहींनी या निर्णयामुळे झालेल्या असुविधेला विरोध केला तर त्याला देशभक्ती शिकविण्याचा प्रकार समाज माध्यमातून सुरू केलेला दिसत आहे. या सगळ्या घटनांना समजून घ्यायचे असेल तर प्रश्न पडतो नेमका देश म्हणजे तरी काय?

देशासाठी, देशकार्यासाठी लढणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, यात शंका नाही. परंतु सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात बोलणे म्हणजे देश विरोधी असे म्हणणे चुकीचे आहे. कारण सरकार आणि देश यामध्ये फरक आहे, सरकारातील नेते सुद्धा देश सेवकच आहे, याचे भान काही वेळेस सत्तेवर आल्यावर राहत नाही.आपल्या देशाने लोकशाही व्यवस्था स्विकारलेली असताना, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असताना काही लोक स्वतःला देशभक्त म्हणत इतर सामान्य त्रासलेल्या लोकांना सैनिकांची उदाहरणे देऊन आपण कसे देशभक्त आहोत हे सांगताना दिसत आहेत.
खरे पाहता देश या शब्दाची व्याख्या आपण किती संकुचितपणे वापरत आहोत हेच यावरून लक्षात येते.

देशातील प्रत्येक नागरिक हा सतत देशकार्यच करत असतो असे म्हणायला हरकत नाही. देशसेवेसाठी फक्त सैनिकच असणे, सरकारी नोकरी किंवा राजकीय नेतृत्व करणे, समाजात उच्च स्थानी जाऊन मिरविणे असे नाही. तर शेतात राबणारा शेतकरी, शहराची, गावाची सफाई करणारा कर्मचारी असो वा हमाली करणारा हमाल असो किंवा एखादा भाजीपाला विक्रेता हे सर्व देशसेवाच करत असतात. या सर्वसामान्य लोकांनी जर कार्य करायचे सोडले तर देशाची काय अवस्था होईल याची कल्पनाच न केलेली बरी. नोटा बंदी निर्णयाचा त्रास या सर्व सामान्य भारतीयांना जास्त प्रमाणात होत आहे व त्यांनाच काही बुद्धिजिवी, नाटकी देशभक्त त्यांना देशभक्ती शिकविण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत आणि हे अयोग्य आहे.

देश म्हटल्यावर सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या जातात. परंतु सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा द्यायलाच हवा हा अट्टाहास लोकशाहीवादी देशात मान्य करता येणार नाही. आपण आपल्या देशाला फक्त सीमेमध्ये बांधू शकत नाही. तसे असेल तर मग परदेशात कार्यरत असलेले भारतीय नागरिक भारतीय नाही का? ते देशभक्त नाहीत का ? असा प्रश्न पडणे स्वभाविक आहे. खरे तर प्रत्येक निर्णयाला अनेक बाजू असतात लोकशाहीमध्ये प्रत्येक बाजूने पाहणे हा हक्कच आहे, चलनातून नोटा रद्द का कराव्या लागतात व त्याचे काय परिणाम होतात हे आधी समजून घ्यायला हवे. मगच आपली देशभक्ती इतरांवर लादायला हवी. चलन रद्द केल्याने महागाई नियंत्रणात येते. बाजार व्यवास्थेतील काळा पैसा बाद होतो. नकली नोटा बंद होतात. अर्थव्यवस्था सुरळीत होते, हे साधे गणित आहे. परंतु हा निर्णय घेताना पाहिजे तेवढ्या सुविधा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि जर सरकार ते पूर्ण करू शकत नसेल तर जनता प्रश्न विचारणारच. म्हणून त्यांना खोटं ठरविण्यात, देशद्रोही ठरविण्यात काय हाशिल आहे.

या अगोदर सुद्धा काही निर्णय याचप्रकारे घेतलेले आहे. त्यावेळी सुद्धा काहींनी विरोध केला तर काहींनी पाठिंबा दिला. म्हणून विरोध करणारे देशद्रोही का? मुळात चुकीच्या धोरणावर बोलणारे वा प्रश्न विचारणारेच खरे देशभक्त असतात असे म्हणायला हरकत नाही.

प्रत्येक वेळी आपल्या निर्णयाला देशभक्तीची जोड देऊन गाजावाजा करत राजकारण करणाऱ्यांसाठी कसला आला देश आणि कसली देशभक्ती? येथे फक्त आपले विचार लादण्याची प्रवृत्ती दिसते. देशासाठी सीमेवर लढणारे सैनिक देशभक्त असतात यात शंकाच नाही. परंतु त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारी त्याची पत्नी, त्याचे सर्व कुटुंब देशभक्त नाही का? त्यांना चलना अभावी त्रास होत नाही का? हे एखाद्या तथाकथित देशभक्ताने स्पष्ट करावे. देशासाठी प्रत्येक नागरिक लढतो आहे. फक्त त्यांना त्या दृष्टीने पाहण्याची दृष्टी हवी. ती अंधभक्तांकडे कदाचित दिसत नाही त्यामुळे हे सगळे प्रश्न उभे राहत आहे.

देश ही एक मोठी विवेकी संकल्पना आहे त्याला आपल्या राजकीय फायद्यासाठी संकुचित करण्यात अर्थ नाही. जे चुकीचे आहे त्यावर बोलणे, त्यात सुधारणा करणे हेच खऱ्या देशवासीयांचे कर्तव्य आहे मग त्यासाठी कितीही त्रास झाला तरी तो सहन करण्याची क्षमता त्या देशवासियामध्ये असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com