दहशतवादी सैफुल म्हणाला, शरण येण्यापेक्षा हुतात्मा होऊ

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

पोलिसांनी सैफुलला ठार मारण्यापूर्वी त्याचा कानपूरमधील भाऊ खालिद याला त्याच्याशी फोनवरून बोलण्यास सांगितले. सैफुलने आपल्या भावाचे न ऐकता शरण येण्यापेक्षा हुतात्मा होऊ असे सांगितले.

लखनौ - उत्तर प्रदेशात चकमकीत ठार मारण्यात आलेला सैफुल याला पोलिसांनी शरण येण्यास सांगितले होते. पण, त्याने शरण येण्यापेक्षा हुतात्मा होऊ असे सांगितल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी सैफुलच्या भावाला त्याच्याशी फोनवरून बोलण्यास सांगितले होते.

इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या सैफुल याला पोलिसांनी मंगळवारी रात्री चकमकीत ठार मारले. भोपाळ-उज्जैन रेल्वेतील स्फोटाशी संबंध असलेला सैफुल हा दहशतवादी काकोरीतील एका घरात लपला होता. हा भाग दाट लोकवस्तीचा असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या घराजवळच्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यास प्रारंभ केला. सैफुल याला शरण येण्याचे आवाहन करूनही त्याने प्रतिसाद दिला नाही. वीस कमांडोंनी घराला वेढा घातल्यानंतर चकमक सुरू झाली. ही चकमक सुमारे चार तास सुरू होती.

पोलिसांनी सैफुलला ठार मारण्यापूर्वी त्याचा कानपूरमधील भाऊ खालिद याला त्याच्याशी फोनवरून बोलण्यास सांगितले. सैफुलने आपल्या भावाचे न ऐकता शरण येण्यापेक्षा हुतात्मा होऊ असे सांगितले. यानंतर पोलिसांनी धुराच्या नळकांड्या व मिरचीचा धुर सोडत त्याला घराबाहेर आणण्याचा प्रयत्न केला. पण, तो घराबाहेर पडला नाही. सैफुल राहत असलेले घर हे बादशाह नावाच्या व्यक्तीचे असून, तो सध्या सौदी अरेबियामध्ये वास्तव्यास आहे. या घरात गेल्या सहा महिन्यांपासून चौघे जण राहत होते.

Web Title: Won't Surrender, Want Martyrdom, Lucknow Terror Suspect Told Brother In Phone Call Made By Cops