अखिलेशचा 'स्मार्ट फोन' योगींकडून 'स्विच ऑफ'!

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पदावर विराजमान झाल्यापासून धडाक्‍याने निर्णय घेतले आहेत. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या काही योजना त्यांनी बंद केल्या आहेत. निवडणूकीपूर्वी अखिलेश यांनी सामान्य नागरिकांसाठी स्वस्त दरात स्मार्ट फोन देण्याची महत्वाकांक्षी योजना जाहीर केली होती. मात्र आदित्यनाथांनी ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पदावर विराजमान झाल्यापासून धडाक्‍याने निर्णय घेतले आहेत. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या काही योजना त्यांनी बंद केल्या आहेत. निवडणूकीपूर्वी अखिलेश यांनी सामान्य नागरिकांसाठी स्वस्त दरात स्मार्ट फोन देण्याची महत्वाकांक्षी योजना जाहीर केली होती. मात्र आदित्यनाथांनी ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारची मंगळवारी दुसरी कॅबिनेट बैठक झाली.त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. अखिलेश यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात ही योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत पाच कोटी नागरिकांना अत्यंत स्वस्त दरात स्मार्ट फोन वितरित करण्यात येणार होते. त्यासाठी एक कोटी पेक्षा जास्त नागरिकांनी नोंदणी केली होती. नागरिकांना स्मार्ट फोन देऊन त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजना पोहोचविणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. आदित्यनाथ यांनी यापूर्वीही अखिलेश यांच्या समाजवादी पेन्शन योजना आणि समाजवादी ऍम्ब्युलन्स योजनेतील 'समाजवादी' हा शब्द हटविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अखिलेश यांचे छायाचित्र असलेल्या शिधापत्रिका रद्द करण्याचाही निर्णय घेतला आहे.

विमानतळांचे नावे बदलले
उत्तर प्रदेशमधील विमानतळांचे नाव बदलण्याचा निर्णयही मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. त्यामध्ये गोरखपूरमधील विमानतळाचे नाव योगी गोरखनाथ तर आग्रा येथील विमानतळाचे नाव दीनदयाळ उपाध्याय असे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिसांच्या बदल्या
उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मंगळवारी संध्याकाळी पोलिस हवालदारापासून पते पोलिस निरीक्षकापर्यंत एकूण 626 जणांच्या बदल्या केल्या आहेत.