गुडघ्याचा अस्थिसंधिवात

डॉ. अमोल नारखेडे, डॉ. पराग संचेती 
गुरुवार, 23 मार्च 2017

वय वाढू लागते, तसे दुखण्यापुढे गुडघे टेकावे लागतात. अस्थिसंधिवाताने माणूस जेरीस येतो. अशा वेळी या वेदना कमी करण्यासाठी नेमके काय करावे? 
 

वय वाढू लागते, तसे दुखण्यापुढे गुडघे टेकावे लागतात. अस्थिसंधिवाताने माणूस जेरीस येतो. अशा वेळी या वेदना कमी करण्यासाठी नेमके काय करावे? 
 

साधारण वयाच्या पन्नाशीनंतर दिसत जाणारी ही अवस्था आहे, जिथे हाडांची झालेली झीज दिसून येते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ते ही ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे, अशांमध्ये ही अवस्था दिसून येते. अस्थिसंधिवातामध्ये गुडघा हा अतिशय सहज विकारग्रस्त होणारा अवयव आहे. त्याला इजा होऊ शकते किंवा तो वेदनेने ग्रासला जाऊ शकतो. जसे वय वाढते तसा हा आजार वाढत जातो. यामुळे होणाऱ्या त्रासाचा सूर चढा असतो. पूर्व, मध्य, मर्यादेच्या आत व असह्य म्हणजेच तीव्र या चार वाढत्या टप्प्यांमधून याचा प्रवास असतो. 

अस्थिसंधिवाताची कारणे : 
गुडघ्याचा सांधा हा मांडीच्या हाडाचा खालच्या भागाचा शेवट, टिबियाचा शेवट व नी कॅप (गुडघ्याची वाटी) यांचा बनलेला असतो. हाडांच्या टोकांना विशिष्ट प्रकारच्या सांध्यासंबंधीच्या पेशींचे आवरण असते. या सांध्यामध्ये एक सायनोव्हीयल द्रव असते जे वाढत्या वयाप्रमाणे सांध्यासंबंधीच्या पेशींचे आणि घुडघ्याच्या सांध्याचे पोषण व स्निग्धीकरण करते. या सांध्यासंबंधीच्या पेशी आपले गुणधर्म गमावतात आणि झिजून जातात. सायनोव्हीयल द्रवाची पातळी सुद्धा कमी कमी होत जाते. काही घटनांमध्ये सांध्यासंबंधीच्या पेशी पूर्णपणे झिजतात व हाडांचे टोक उघडे पडते आणि त्यामुळेच असह्य वेदना होतात. 

अस्थिसंधिवाताची लक्षणे : 

  • वेदना, सूज, व्यंग 
  • मर्यादित हालचाल 
  • हाडे एकमेकांवर घासल्या गेल्यानंतर येणारा आवाज 
  • पायऱ्या चढताना आणि उतरताना होणारा त्रास 
  • बसलेल्या अवस्थेतून उठताना होणारा त्रास 

निदान : 
एक्‍स रे काढून तसेच वैद्यकीय मूल्यमापन करून याचे निदान केले जाते. 

उपचार : 
अ. विनाशस्त्रक्रिया उपचार : 

फिजियोथेरेपीचा वापर : सांध्याची हालचाल आणि अस्थिसंधिवाताची वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता व्यायाम महत्त्वाचा आहे. 

  • - वजन कमी करणे : यामुळे गुडघ्याच्या सांध्यांवर येणारा शरीराचा भार कमी होतो. 
  • - जीवनशैलीत बदल करणे : मांडी घालून बसणे, जमिनीवर बसणे तसेच भारतीय पद्धतीच्या शौचालयांचा वापर टाळणे. पायऱ्यांवर बसणे आणि खाली उतरणे, त्वरित आणि उत्साहाच्या भरात होणाऱ्या हालचाली टाळणे. 
  • औषधोपचार : फिजियोथेरेपीबरोबर औषधांचा वापर केल्यामुळे वेदना व दाह कमी होण्यास मदत होते. 

नी कॅप/ ब्रेसेस : संध्याला आधार मिळण्यासाठी याचा वापर करणे 

पादत्राणांमध्ये बदल : चालताना शरीराचे वजन विभागले जाऊन त्रास कमी होण्यास मदत होते. 

इंजेक्‍शन्स : स्टेरॉईड व ह्यालूरोनिक ऍसिड इंजेक्‍शन्स पूर्व आणि मध्य टप्यावर उपयोगी आहेत. संधीवातामुळे होणाऱ्या वेदना व दाह ते कमी करतात, स्निग्धीकरण करतात. त्यामुळे सांध्याची हालचाल होते. 

ब. शस्त्रक्रियेद्वारे उपचार : 
हाडामध्ये किंवा हाडामधून छेद घेण्यासाठी शस्त्रक्रिया :
चालताना दोन्ही पायांवर समान वजन विभागले जाण्यासाठी ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये हाडाला शस्त्रक्रिया करून योग्य आकार दिला जातो. जेव्हा अस्थिसंधिवात वयाच्या पन्नाशीदरम्यान येतो तेव्हाच ही शस्त्रक्रिया केली जाते. परंतु यामध्ये कायमस्वरूपी आधार मिळेल किंवा परत आजार उद्भवणार नाही याची खात्री/अंदाज देता येत नाही. 

अर्थ्रोस्कोपी : जेवढे गरजेचे आहे तेवढेच उपाय हाडांवर करण्यात येणारी ही शस्त्रक्रिया फक्त तांत्रिक कारणांमुळे ज्यांना वेदना आहेत त्यांनाच उपयोगी पडते. संधिवातामुळे होणाऱ्या वेदनांना ही शस्त्रक्रिया कमी करू शकत नाही किंवा या आजारातील नैसर्गिक गोष्टींनाही कमी करू शकत नाही. 

गुडघ्याची वाटी बदलणे : जेव्हा विना शस्त्रक्रिया उपचारांचा उपयोग होत नाही तेव्हा याचा सल्ला दिला जातो. गुडघ्याची वाटी बदलणे ही शस्त्रक्रिया एक सुरक्षित व परिणामकारक प्रक्रिया आहे, ज्यात उत्तम निकालाची खात्री देता येते व याचे परिणाम दीर्घकालीन असतात. यामुळे वेदना कमी होतात, झीज कमी होते व दैनंदिन हालचाली करण्यास आपल्याला मदत होते.