मनारोग्यं मम संपदा!

Child
Child

मुलांना नीट वाढू द्या. त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या जोपासनेकडे लक्ष द्या. मात्र त्यांच्यावर सावली धरून त्यांना खुरटवून टाकू नका.

उत्तम आरोग्याला अनन्यसाधारण महत्व आहे. उत्तम आरोग्याला आपण धनसंपदा मानतो आणि रास्त आहेच ते.

आपल्या घरातली मुलगी वयात आल्यापासून, ते तिच्या लग्नापर्यंत, तिचे बाळ पोटात असल्याची पहिली चाहूल लागल्यापासून बाळाच्या जन्मानंतरही जवळ जवळ सहा महिन्यापर्यंत बाळाच्या पोषणावर संपूर्ण कुटुंब प्रचंड भर देत असते. काही सुज्ञ जोडपी गर्भसंस्कारही करतात. बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या काही दिवसात आपल्या बाळाला आपलं दूध कमी तर पडत नसेल ना ही शंकेची पाल प्रत्येक आईच्या मनात एकदा तरी चुकचुकून जातेच. ते बाळ जस जसं मोठं होतं तस तसं आपल्या बाळाच्या पोटात सगळ्या भाज्या-फळे-डाळी जायलाच हवीत हा अट्टाहास किंवा ठराविक एक बाऊल भात, बाटलीभर दूध त्याने घ्यायलाच हवं असा हट्टाचा काळ चालू राहतो. 

हळूहळू बाळाच्या आवडीनिवडी आकार घ्यायला लागतात आणि मग ते हे आवडत नाही, ते आवडत नाही असे सुरू होते. घरातली सगळीच मंडळी मग बाळ काकावर गेलंय, मामावर गेलंय अशा गृहीतकांवर बाळाच्या या ‘घर डोक्‍यावर घेण्याच्या अनाठायी तंत्रांकडे’ अती लक्ष द्यायला लागतात. काही वर्षांनी मग अर्थातच यक्षप्रश्न उभे ठाकतात. आपलं बाळ एकतर ‘अशक्त’ आहे अशी शंका येणं किंवा आपलं बाळ स्थूलतेकडे झुकतंय का अशी शंका येणं. हे झालं खाण्यापिण्या बद्दल, अगदी हीच सगळी आवर्तनं त्याच्या स्वभाव आणि वर्तनाच्या बाबतीत लावली जातात. म्हणजे पहिली काही वर्ष त्याचे लाड करणे, नंतरची काही त्याला शिस्त लावणे आणि त्यानंतरची काही मात्रं आमचा/ची मनू आजोबा/आजी/मामा/आत्या पैकी हुबेहूब कोणासारखा तरी तापट/लहरी/चोखंदळ जे असेल ते आहे. गंमत म्हणजे मुलांसमोरच चाललेल्या आपल्या ह्या चर्चेचा (त्यांचं आपल्याकडे लक्ष असू दे वा नसू दे) त्यांच्या वर्तनावर कळत-नकळत परिणाम होत असतो, हे लक्षातच घेतले जात नाही.

मुलांच्या उत्तम आरोग्यावर आपण घालवत असलेल्या वेळ-पैसा-शक्तीचे चार-तीन-दोन-एक अशा भागांमध्ये विभाजन केले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं (मुलं-मोठे सगळे आले ह्यात) स्वास्थ्य हे ४०टक्के आपला दिवसभराचा मानसिक आहार आणि व्यायाम, ३० टक्के शारीरिक आहार, २० टक्के शारीरिक व्यायाम व १० टक्के वंशपरंपरेने आपल्याला मिळालेला आरोग्याचा/ अनारोग्याचा ठेवा यांवर अवलंबून असतं.

आपल्या बाळाच्या पोषणाचा पहिला कप्पा, ४० टक्के हिस्सा हा मानसिक आहार आणि व्यायामाचा असणे नितांत गरजेचं आहे. मानसिक आहारात परत दोन उपभाग, एक कौटुंबिक मन:स्वास्थ्य टिकवणारे पौष्टिक घटक जसं एकमेकांचा/ एकमेकांच्या कामाचा / भूमिकेचा आदर करणे, एकमेकांशी न ओरडता बोलणे. दुसरा उपभाग म्हणजे, सामाजिक मन:स्वास्थ्य सांभाळणारे घटक, अर्थात ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचं आपण थोडं तरी देणं लागतो याचं भान असणे. पहिलं पोषक तत्वं आपल्या पाल्ल्याला उत्तम माणूस बनवू शकेल आणि दुसरं, एक जवाबदार नागरिक. मूल मानसिकरीत्या कौटुंबिक आणि सामाजिक दोन्ही स्तरांवर सुदृढ राहण्याची जबाबदारी अख्या कुटुंबाने सामूहिकरीत्या पेलली पाहिजे.

‘शिक्षण’ ही एक प्रक्रिया आहे असं आपण म्हणतो, तेव्हा मुलं जे काही वागतात/बोलतात ते काही प्रमाणात निरीक्षणावर आणि काही  प्रमाणात मुलं जे काही कळत-नकळत बघतात, ऐकतात, वाचतात यावर अवलंबून आहे. त्यांचं हे निरीक्षण/ग्रहण करणं म्हणजेच जुन्या भाषेत सांगायचं झालं तर हे ‘संस्कार’ करणं आहे. ‘संस्कार’ म्हणजे फक्त शुभंकरोती/मनाचे श्‍लोक/अथर्वशीर्ष तोंडपाठ असणं एवढेच नाही. रोजच्या जीवनात वावरतांना त्यांचं समाजभान जागृत ठेवणं हा संस्कार आहे. म्हणजे अगदी साध्या गोष्टी- रस्त्यात कचरा टाकायचा नाही, वाहतुकीचे नियम पाळायचे, प्राण्यांना विनाकारण दगड मार/शेपूट ओढ असा त्रास द्यायचा नाही, सुंदर फुलं झाडावरून ओरबाडायची नाहीत, एवढ्या खूप साध्या आणि छोट्या सवयी. 

उरलेले शेवटचे दोन कप्पे, २० टक्के आणि १० टक्के अर्थात, व्यायाम आणि आनुवंशिकता. अगदी तान्हं मूल जेव्हा रडतं तेव्हा आपण लगेच अस्वस्थ होतो, त्याला शांत करायचा खटाटोप सुरु करतो, आपण त्याला काय झालंय, काही चावलं नाही ना, किंवा ओलं केलं नाही ना ह्याची खात्री केल्यानंतरही उगाच कंटाळून जर बाळ रडत असेल तर थोडा वेळ त्याला रडू द्यायला काहीच हरकत नाही; कारण  खरं तर बाळाच रडणं हा सुद्धा त्याच्यासाठी एक व्यायाम आहे. आजकालच्या मुलांना खेळायला जागा नाही हा त्यांचा दोष आहे का, तर नक्कीच नाही. पण त्यावर उपाय शोधले पाहिजेत. तीन वर्षे वयापुढील प्रत्येक मुलाला व्यायामाची नितांत गरज असते; पहिलं त्याची शक्ती योग्य ठिकाणी लागण्याच्या दृष्टीने आणि दुसरं- योग्य प्रमाणात भूक आणि झोप लागण्याच्या दृष्टीने. प्रत्येक मुलाने किमान एक तास तरी मोकळ्या हवेत/जागेत खेळणे महत्वाचं आहे. 

व्यायामात / खेळात सुद्धा अर्थात समतोल हवा. काही पालकांचा सहज दिसून येणारा अतिरेकी ‘प्रोत्साहन’ शक्‍यतो नकोच. ‘रिॲलिटी शोज’मधल्या पालक-मुलाचं रडणं, भावनिक बांध फुटणं तर अक्षरशः बघवत नाही. ज्या प्रकारचा ताण त्या ‘शोज’मधल्या मुलांवर दिसतो, तो अयोग्य आहे. मैदानी खेळ किंवा व्यायाम किंवा एखादी कला आपल्या मुलाला यावी म्हणून प्रोत्साहन देणं म्हणजे माझं मूल ‘सचिन तेंडुलकर’ किंवा ‘गीता-बबिता’ किंवा ‘झाकीर हुसैन’च झालं पाहिजे हा अट्टाहास करायची गरज नाही. एक तास व्यायाम / मनोरंजन हा आपल्या पाल्याच्या तब्येतीच्या आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे एवढंच लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे.

मैदानी खेळांमुळे मुलांची मानसिकता सुद्धा अधिक सक्षम होते. 
आनुवंशिकतेबाबत आपण फारसं काहीही करू शकत नाही. काही प्रमाणात रंग, उंची, केस, शरीराचा बांधा, चष्मा या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडच्या आहेत, पण स्वभावातला तिरसटपणा, चेंगटपणा, आत्मविश्वासाची टोकाची पातळी ह्यासारख्या दोषांवर नक्की काम करता येऊ शकतं. म्हणून ज्या गोष्टींबद्दल आपण काही करू शकत नाही त्यावर उगाच निरर्थक वेळ आणि पैसा घालवण्यापेक्षा, आपण जेवढ्या लवकर त्यांचा स्वीकार करू तेवढ्या लवकर त्या अडचणी आहेत असं वाटणच बंद होईल. 

मुलांना नीट वाढू द्या, त्यांच्यावर सावली धरून त्यांना खुरटी करू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com