#FamilyDoctor बाळाच्या पोषणासाठी...

#FamilyDoctor बाळाच्या पोषणासाठी...

बाळाच्या पोषणासाठी, त्याच्या आरोग्यासाठी मातेचे दूध मिळायला हवे. बाळाचा तो हक्क असतो. मातेच्या दुधातून बाळाला पाणी, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर अनेक पोषक घटक मिळतात. अधिक काळ स्तन्यपान झालेल्या बाळाच्या मेंदूचा विकास आणि एकूणच वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. 

बाळाला जन्मानंतर अर्ध्या तासात मातेचे दूध मिळायला सुरवात व्हायला हवी. बाळाने कितीही वेळा दूध प्यायचे ठरवले तरी त्याला ते प्यायला मिळायला हवे. हा त्याचा हक्कच आहे. जेवढा अधिक काळ बाळ आईचे दूध पीत असेल तर ते त्याच्या एकूणच वाढीसाठी व मेंदूच्या विकासासाठी भल्याचेच ठरते. बाळाच्या पोषणासाठी, त्याच्या आरोग्यासाठी स्तन्यपान का व कसे महत्त्वाचे आहे ते पाहू.

बाळाला फायदा

  • नवजात बाळांसाठी मातेच्या दुधाइतके चांगले अन्न दुसरे नाही. हे दूध पचायला हलके असते. आईच्या दुधाला गाईच्या दुधाचा किंवा अन्य कसलाही पर्याय नाही. 
  • मातेला येणारे पहिले घट्ट दूध म्हणजे ’कोलोस्ट्रम’ पिवळसर रंगाचे दिसते, ते बाळासाठी अमृतच असते. 
  • मातेच्या दुधातून बाळाला आवश्‍यक असणारी सर्व पोषणमूल्ये मिळतात. म्हणजेच पाणी, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर अनेक पोषक घटक मिळतात.
  • बाहेरच्या संसर्गांच्या विरोधातील रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यासाठीची ‘प्रतिपिंडे’ मातेच्या दुधातून मिळतात. त्यामुळे बाळाचे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होते. 
  • केवळ लहानपणीच नाही, तर मोठेपणीही मधुमेह, हृदयरोग, अस्थमा, ॲलर्जी अशा विविध आजारांपासून बाळाचा बचाव करण्यासाठी आईचे दूध उपयुक्त ठरते. 

कसे करावे स्तन्यपान?

  • आपल्या बाळाच्या भल्यासाठी आईनेच स्तन्यपानासाठी उत्सुक असायला हवे. त्याचबरोबर काही काळजीही घ्यायला हवी. 
  • स्तन्यपान देण्यासाठी आईने पाठीला आधार मिळेल अशा पद्धतीने आरामदायक स्थितीत बसायला हवे.
  • बाळाला हातात नीट धरून त्याचे डोके त्याच्या शरीरापेक्षा थोडेसे वर राहील, असे पाहावे. पहिलटकरणीने डॉक्‍टरांकडून किंवा स्तन्यपान सल्ला सहायकाकडून योग्य स्थितीतील स्तन्यपानाची माहिती घ्यावी.
  • दूध पिताना बाळाची स्तनाग्रावरची पकड योग्य नसेल, तर स्तनाग्रांना जखम होण्याची शक्‍यता असते. स्तन्यपान देताना मातेला वेदना होत असल्यास साहजिकपणे त्याचा परिणाम स्तन्यपान करण्यावर होतो. अशावेळी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.  
  • आई तणावात असेल, उशिराने स्तन्यपानाला सुरवात झाली असेल तर, तसेच अन्य कारणानेही काही वेळा दूध पुरेसे येत नाही. बाळाने थोड्या थोड्या वेळाने दूध मागणे म्हणजे आईला कमी दूध येते, त्याचे पोट भरत नाही असे समजू नये. बाळाला हवे तेव्हा, हवे तितक्‍या वेळा दूध प्यायला द्या. 
  • गर्भारपणाच्या काळात, तसेच बाळंतपणानंतरही आईने नियमित व्यायाम करावा. योग्य आणि पौष्टिक आहार घ्यावा, तसेच मानसिक शांततेकडे आवर्जून लक्ष पुरवावे. 
  • स्तन्यपान करणाऱ्या मातांनी दिवसात साधारणत: आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्‍यक असते. या काळात मातेच्या आहारात नेहमीपेक्षा अधिक उष्मांक हवेत. दूध, दही, बीट, हिरव्या पालेभाज्या या गोष्टी आहारात जरूर असाव्यात. 
  • पारंपरिक पद्धतीने बाळंतपणानंतर दिले जाणारे डिंक, अळीव अथवा मेथीचे लाडू, शतावरी यामुळे दूध वाढण्यास फायदा होतो. 

आईला फायदा
स्तन्यपानाचा आईलाही फायदा होतो. स्तन्यपान करत असताना आईच्या शरीरात ‘ऑक्‍सिटोसिन’ या संप्रेरकाचे स्रवण होते. बाळंतपणात गर्भाशयाचा वाढलेला आकार कमी होण्यास या संप्रेरकामुळे मदत होते. बाळंतपणात स्त्रीचे वाढलेले वजन घटण्यासही त्याचा फायदा होतो. याखेरीज आणखी एक मोठा फायदा अलीकडे लक्षात आला आहे, तो म्हणजे स्तन्यपान करणाऱ्या स्त्रियांना भविष्यात स्तनांचा कर्करोग; तसेच गर्भाशयाशी संबंधित कर्करोग होण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com