कालमृत्यू, अकालमृत्यू

कालमृत्यू, अकालमृत्यू

"काळ' किंवा "काल' हे एक असे तत्त्व आहे, जे अनादी, अनंत व अव्याहत आहे. म्हणजे काळाची सुरवात कधी झाली हे कोणी सांगू शकत नाही. कारण, सृष्टीची उत्पत्ती कधी झाली, पृथ्वी अस्तित्वात कधी आली, या गोष्टी जरी मनुष्य आपल्या बुद्धीच्या किंवा तर्काच्या जोरावर सांगू शकला तरी काळ हा त्याच्याही पूर्वी होताच. काळाचा कधी अंत होऊ शकत नाही. सृष्टीचा व विश्वाचा विनाश झाला तरी काळ तसाच राहील आणि काळाची गती कधीच थांबणार नाही. काळ मोजण्यासाठी त्याचे वर्ष, महिना, आठवडा, दिवस-रात्र, मुहूर्त असे विभाग केले, तरी तो अव्याहत गतीने चालूच राहतो. आयुर्वेदात "काळ'तत्त्व इतके महत्त्वाचे समजले जाते, की त्याला "भगवान' अशी उपाधी दिलेली आहे.


कालो हि नाम भगवान्‌ स्वयंभुः अनादिमध्यनिधनोऽत्र । रसव्यापत्सम्पत्ती जीवितमरणे च मनुष्याणामायन्ते ।।... सुश्रुत सूत्रस्थान


काल हा भगवान आहे, तो स्वयंभू आहे, त्याला आदी (प्रारंभ), मध्य किंवा अंत नाही. द्रव्यांच्या ठिकाणी असणाऱ्या रसाचा क्षय किंवा वृद्धी, दोष किंवा संपन्नता, तसेच मनुष्यमात्राचे जीवन आणि मरण हे सर्व कालाच्या आधीन आहे.


संकलयति कालयति वा भूतानाम्‌ इति कालः ।... सुश्रुत सूत्रस्थान
प्रलयकाळी जो सर्व तत्त्वांचे (त्यांच्या मूळ स्वरूपात) संकलन करतो आणि सर्व प्राणिमात्रांचा संहार करतो तो काळ होय.


ऊन-सावली, सुख-दुःख, दिवस-रात्र, प्रकाश-अंधार या जशा एकामागोमाग दुसरा भाव येणाऱ्या जोड्या आहेत, तसेच जन्म-मृत्यू हीसुद्धा एक जोडीच आहे. जो जन्माला येतो, तो एक ना एक दिवस मृत्यू पावणारच आहे. मात्र, तो अकाली येऊ नये यासाठी प्रयत्न करता येतात, असे आयुर्वेदशास्त्र सांगते.

आयुष्याचे मान?
"आयु' किंवा "आयुष्य' हा आत्मज भाव आहे, असे चरकाचार्य सांगतात. म्हणजे गर्भाची उत्पत्ती होण्यास कारणीभूत असणारे जे काही भाव आहेत, त्यातल्या आत्मज, आत्म्याकडून येणाऱ्या भावांमधला एक भाव म्हणजे आयुष्य. दीर्घायुष्य, अल्पायुष्य किंवा मध्यम आयुष्य हे त्या त्या आत्म्यावर अवलंबून असते. परंतु, तरीसुद्धा गर्भाचा जन्म झाल्यावर, जीवन सुरू झाल्यावर आयुष्याच्या प्रमाणात, आयुष्याच्या प्रतीमध्ये बदल करता येऊ शकतात.


आयुष्याचे मान अगोदरच ठरलेले असते असे काही शास्त्रे मानत असली, तरी आयुर्वेदाने याची अनेक उदाहरणे देऊन खंडन केलेले आहे. जर प्रत्येकाचे आयुष्य "नियत' म्हणजे ठरलेले असेल तर,
- रोगापासून प्रतिकार करण्याची, रोग झाल्यावर तो बरा करण्याची आवश्‍यकताच राहणार नाही.
- औषध-सेवन, रसायन-सेवन यांना अर्थच राहणार नाही.
- अग्नी, वादळ, महापूर वगैरे नैसर्गिक आपत्तींपासून स्वतःचे रक्षण करण्याचे कारणच उरणार नाही.
- सिंह, वाघ, विषारी प्राणी वगैरे प्राण्यांपासून दूर राहण्याची गरजच राहणार नाही.
- व्यसनाधीन, विकृत, दुष्ट बुद्धियुक्‍त व्यक्‍तींपासून दूर राहण्याचे प्रयोजन उरणार नाही.
- स्वशक्‍तीपेक्षा जास्त काम करणे, चुकीचा आहार घेणे, चुकीचे आचरण करणे यापासून नुकसान होण्याची भीती राहणार नाही.
- फाशी किंवा कोणत्याही प्रकारे मृत्युदंड अस्तित्वातच येणार नाही.
- युद्धात किंवा कोणत्याही वादविवादामध्ये समोरच्याकडून हल्ला झाला, तरी जीव जाण्याची शक्‍यता उरणार नाही.
- कोणीही मनुष्य समाजाने ठरवून घेतलेले किंवा पूर्वापार चालत आलेले नियम, सद्‌वृत्त, सदाचरण पाळण्याचा प्रयत्न करणार नाही.
- आयुष्यरक्षणासाठी विशिष्ट मणी, रत्ने किंवा औषधी द्रव्ये शरीरावर धारण करायची असतात किंवा मंगलपाठ वगैरे करायचे असतात, त्यांचे महत्त्वच उरणार नाही.
- आयुर्वेदाने सांगितलेले वयःस्थापन, रसायन उपचार, कायाकल्पाचे उपाय हेसुद्धा सर्व निरर्थक ठरतील.
- समस्त प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी प्राचीन काळी ऋषिमुनींनी स्वर्गात जाऊन जे आयुर्वेदशास्त्र पृथ्वीतलावर आणले, त्याला अर्थ राहणार नाही.
परंतु, प्रत्यक्षात असे घडत नाही हा सर्वांचाच अनुभव असतो.

अहितकर उपचाराने नाश
स्वतःच्या प्रकृतीचा विचार करून ज्या व्यक्‍ती हितकारक आहार-आचरण करण्यास प्रवृत्त होतात त्यांचे आयुष्य सहसा निरोगी, दीर्घायुष्यपूर्ण आणि सुखी असते असे दिसते. या उलट, जे नियमांचे उल्लंघन करतात, अहितकर आहार-आचरण अंगीकारतात, त्यांचा अकाली नाश होण्याची शक्‍यता अधिक असते.


हितोपचारमूलं जीवितम्‌ अतो विपर्ययान्मृत्युः ।... चरक विमानस्थान


हितकर उपचार हे जीवनाचे मूळ, तर अहितकर उपचार हे मृत्यूचे कारण समजले जाते.
"नाश' ही एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. उत्पन्न झालेली प्रत्येक गोष्ट कधी ना कधी नष्ट होणार असली, तरी ती यथासमय म्हणजे ज्या उद्देशाने उत्पन्न झाली तो उद्देश पूर्ण करून मग नष्ट झाली का असमय म्हणजे उद्देश पूर्ण होण्यापूर्वीच नष्ट झाली हे पाहणे महत्त्वाचे असते. ही संकल्पना समजावण्यासाठी चरकाचार्यांनी बैलगाडीच्या चाकाचे उदाहरण दिले आहे. जसे उत्तम प्रतीच्या साधनसामग्रीचा वापर करून बैलगाडीची उत्तम चाके तयार केली, चाक फिरावे यासाठी त्याच्या मध्यात उत्तम प्रकारे "अक्ष' बसविला व अशी बैलगाडी वापरण्यास सुरवात केली तरी अक्षाचे आणि चाकाचे घर्षण होऊन कालांतराने, स्वभावतः अक्षाचा नाश होतो. याला "यथाकाल' किंवा "यथासमय' नाश म्हणतात. याच प्रकारे जेव्हा एखाद्या व्यक्‍तीची मूळ प्रकृतीही चांगली आहे आणि त्या व्यक्‍तीने दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या यांचे व्यवस्थित पालन केले; हितकर आहार, औषध, रसायन यांचे सेवन केले, योग्य वेळी योग्य प्रकारे शरीरशुद्धी करून घेतली, तरी वयोमानानुसार आणि काळानुसार शरीराचा क्षय होणे आणि आयुष्य संपणे हे स्वाभाविक समजले जाते.


मात्र, बैलगाडीची चाके छान बळकट असली तरी, जर तिच्यावर प्रमाणापेक्षा अधिक ओझे लादले, बैलगाडी खडबडीत रस्त्यावरून किंवा रस्ता नसलेल्या जागेवरून चालवली, चालकाच्या असावधानतेमुळे किंवा बैलांच्या उद्दंडतेमुळे अक्ष व चाकातील बंधन निघून आले, अक्षाला वेळोवेळी तेलाचे वंगण दिले नाही, अपघात वगैरे आपत्तींना सामोरे जावे लागले, तर बैलगाडी अयथासमय किंवा अकाली नष्ट होईल, काम पूर्णत्वाला नेण्यापूर्वीच मोडकळीला येईल. त्याप्रमाणे एखादी व्यक्‍ती जर स्वतःच्या ताकदीपेक्षा अधिक, अनुचित प्रकारे, अतिधाडस करून कार्य करेल, पचनशक्‍तीचा विचार न करता अन्न सेवन करेल, चुकीचे अन्न सेवन करेल, अनुचित प्रकारचा व्यायाम करेल, अति मैथुन करेल, असज्जन लोकांबरोबर व्यवहार करेल, मलमूत्रादी नैसर्गिक वेगांची उपेक्षा करेल; काम, क्रोध, लोभादीच्या आहारी जाईल, अपघातग्रस्त होईल; विष, अग्नी, दूषित हवा, दुष्ट शक्‍ती यांनी ग्रस्त होईल, रोगावर योग्य उपचार घेणार नाही, अशा व्यक्‍तीचे आयुष्य मध्यातच किंवा अकाली समाप्त होईल. यालाच अकालमृत्यू असे म्हणावे. म्हणजेच जन्माला येण्यामागचा उद्देश पूर्ण करायचा असेल आणि अकाली मरण नको असेल, तर प्रत्येकाने आपल्या शरीराची, आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्यायला हवी.


प्राचीन भारतीय शास्त्रांमध्ये सत्ययुग, कृतयुग, त्रेतायुग आणि कलियुग अशा प्रकारे चार युगांचा उल्लेख आढळतो. या प्रत्येक युगात मनुष्याचे नियत आयुष्यमान ठरलेले आहे. सध्या चालू असलेल्या कलियुगात सरासरी आयुष्य शंभर वर्षे आहे. हे शंभर वर्षांचे आयुष्य निरोगी आणि सुखात जगायचे असेल आणि अकाल मृत्यू टाळायचा असेल, तर सुरवातीपासून म्हणजे गर्भधारणेच्या आधीपासून बीजसंपन्नतेच्या दृष्टीने प्रयत्न करणे, जन्मानंतर आरोग्यरक्षणासाठी सांगितलेल्या "जातमात्र' संस्कारातील सर्व गोष्टी पाळणे, नंतरही कायम स्वतःची प्रकृती, शक्‍ती, दोष यांचा विचार करून हितकर आहार-आचरणाचे पालन करणे, रोग होऊ नयेत म्हणून रसायन किंवा नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेल्या प्रकृतीनुरूप औषधांचे सेवन करणे; व्यायाम, योग, ध्यान वगैरे गोष्टींसाठी वेळ काढणे, शरीरशुद्धीसाठी पंचकर्मासारखे उपचार करून घेणे, सद्‌वृत्ताचे पालन करून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे हे सर्व उपाय उपयुक्‍त असतात.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com