Backpain : पाठदुखी

सहसा चाळिशीनंतर दुखणी डोके वर काढतात असा आत्तापर्यंतचा समज होता. सध्या मात्र पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी या त्रासांना वयाचा निर्बंध राहिलेला दिसत नाही.
Backpain : पाठदुखी

सध्याची अनियमित आणि धावपळीची जीवनशैली यामुळे अगदी लहान वयातही पाठदुखी सुरू होऊ शकते.  आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, व्यायामाचा अभाव, फार मऊ गादीवर झोपणे, उंच उशी वापरणे, स्थौल्य, उंच टाचेच्या चपला वापरणे, जड वस्तू उचलणे, ओढणे ही सुद्धा पाठदुखीला आमंत्रण देणारी असतात. 

सहसा चाळिशीनंतर दुखणी डोके वर काढतात असा आत्तापर्यंतचा समज होता. सध्या मात्र पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी या त्रासांना वयाचा निर्बंध राहिलेला दिसत नाही. तरुण वयातच नव्हे तर, लहान मुलांनाही पाठदुखीचा त्रास होताना दिसतो. सध्याची अनियमित आणि धावपळीची जीवनशैली हे यामागचे मोठे कारण असू शकते. विशेषतः लहान मुलांना पाठीवर उचलावे लागणारे दप्तराचे ओझे, प्रवास करताना पाठीवर झेलावे लागणारे खड्ड्यांचे धक्के, संगणकावर काम करणाऱ्यांच्या किंवा सतत मोबाईलच्या वापराने मान-पाठीवर येणारा ताण अशी कितीतरी कारणे पाठदुखीला कारण ठरू शकतात.

वाढत्या वयानुसारही पाठ-कंबरदुखी सुरू होऊ शकते. आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, व्यायामाचा अभाव, फार मऊ गादीवर झोपणे, उंच उशी वापरणे, स्थौल्य, उंच टाचेच्या चपला वापरणे, जड वस्तू उचलणे, ओढणे ही सुद्धा पाठदुखीला आमंत्रण देणारी असतात. यातील काही कारणे टाळता येण्यासारखी असतात तर काही अनिवार्य असतात. अशा वेळी योग्य उपचार करणे, भविष्यात पाठदुखीचा त्रास होऊ नये म्हणून आधीच काळजी घेणे महत्त्वाचे असते. 

का उद्‌भवते तक्रार?
स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयातील अशक्‍तता पाठदुखीला कारण ठरू शकते. अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या दिवसात अतिरक्‍तस्राव होणे हे सुद्धा पाठदुखीला आमंत्रण देऊ शकते. स्त्रीप्रजननसंस्थेत कुठेही सूज असली, जंतुसंसर्ग असला तरी त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी उद्भवू शकते. अर्थात अशा वेळी फक्‍त पाठीवर नाही तर आतील दोषावर नेमके उपचार करणे आवश्‍यक असते. 

पाठीचा कणा हा संपूर्ण शरीराचा भरभक्कम आधार असतो. वाकणे, उठणे, बसणे, वळणे, चालणे अशा बहुतेक सर्वच क्रिया करताना आपण पाठीच्या कण्याचा वापर करत असतो. मानेमध्ये सात, छातीच्या मागच्या भागामध्ये बारा, कंबरेमध्ये पाच मणके असतात, माकडहाडाचे पाच मणके एकमेकांशी सांधलेल्या स्थितीत असतात व त्याच्याही खाली तीन-पाच मणके जुळलेल्या स्थितीत असणारा कॉसिक्‍स म्हणून कण्याचा शेवटचा भाग असतो. अशा प्रकारे कवटीपासून ते बैठकीच्या भागापर्यंत हे सर्व मणके एकावर एक रचलेल्या स्थितीत असतात. दोन मणक्‍यांमध्ये जणू रबरापासून बनविल्यासारखी चकती असते, जिला ‘डिस्क’ (गादी) असे म्हटले जाते. या मधल्या चकतीमुळेच कणा वाकू शकतो, वळू शकतो. या शिवाय या सर्व मणक्‍यांना व चकत्यांना धरून ठेवणारे अनेक संधिबंधने, स्नायूू असतात. या कण्यामध्ये मज्जारज्जूचे स्थान असते. अतिशय महत्त्वाच्या व नाजूक मज्जारज्जूला पाठीचा कणा चहूबाजूंनी सुरक्षित ठेवण्याचे काम करत असतो. 

आयुर्वेदानुसार विचार केला तर पाठदुखी, कंबरदुखी ही वातदोषातील बिघाडाशी संबंधित तक्रार होय. पाठीतील लवचिकता कमी होणे, उठता-बसताना आधाराची गरज भासणे, पाठ जखडणे, पाठीत चमक भरणे वगैरे सर्व तक्रारी वातदोषाशी संबंधित असतात आणि म्हणूनच पाठदुखी, कंबरदुखीवर उपचार करताना वाढलेल्या, बिघडलेल्या वातदोषाला संतुलित करणे, झीज झालेली असल्यास ती भरून काढणे आणि ज्या कारणामुळे पाठदुखी सुरू झाली असेल ते कारण दूर करणे अशा प्रकारे योजना करणे आवश्‍यक असते. 

पाठ दुखायला लागली की विश्रांती घ्यावीशी वाटते हा सर्वांचा अनुभव असतो आणि सहसा यामुळे बरेही वाटते. मात्र फार तीव्र स्वरूपाची पाठदुखी असेल, अगदी साध्या हालचाली करणेही अवघड होत असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक असते. विशेषतः वेदना पाठीतून सुरू होऊन पायांच्या टोकापर्यंत पोचत असतील, श्वासोच्छ्वास करताना त्रास होत असेल, छातीत दुखत असले तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे इष्ट होय. परंतु अशी परिस्थिती येऊ नये यासाठी दक्ष राहणेच इष्ट. 

अशी घ्या काळजी
संपूर्ण शरीराचा आधार असणाऱ्या पाठीच्या कण्याची सुरवातीपासून काळजी घेतली तर पाठदुखी-कंबरदुखीला प्रतिबंध तर होतोच, पण एकंदर चेतासंस्थेचे आरोग्य व्यवस्थित राहायला मदत मिळते. वातदोष संतुलित राहावा, पाठीच्या कण्यातील हाडे व सांधे तसेच आतील मज्जारज्जू यांचे पोषण व्हावे या दृष्टीने पुढील उपचार करता येतात.

मान व पाठीला तेल लावणे. वाताला संतुलित ठेवण्यासाठी, सांध्यांची लवचिकता कायम ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपाय होय. स्वतःहून किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी खालून वर या दिशेने पाठीच्या कण्याला तेल उदा. संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल लावता येते. 

नस्य - रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात घरचे साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकणे. विशेषतः हे मानेच्या आरोग्यासाठी उपयुक्‍त असते. तसेच मेरुदंडाला ताकद देण्यासाठी साहायक असते. 

रोजच्या रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे. वाताच्या असंतुलनामुळे पोट साफ होत नाही, आणि पोट साफ झाले नाही तर त्यामुळे वात अजूनच बिघडतो. अर्थातच या दुष्ट चक्राचा पाठीच्या कण्यावरही दुष्परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे चांगले. आवश्‍यकतेनुसार अन्नयोग गोळ्या, त्रिफळा, सॅनकूलसारखे चूर्ण घेता येते. 

आहारात वातशामक, कफपोषक पदार्थांचा समावेश असणे - किमान चार-पाच चमचे घरचे साजूक तूप रोजच्या आहारात ठेवणे, रोज कपभर ताजे सकस दूध पिणे, दुधात खारकेची एक चमचा पूड टाकणे, बरोबरीने शतावरी कल्प, चैतन्य कल्प घेणे  हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे हितकारक ठरते. 
 मज्जापोषक, अस्थिपोषक पदार्थांचे सेवन करणे - खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, बदाम, च्यवनप्राश, मॅरोसॅनसारखे रसायन रोज घेणे हे मणके, मेरुदंड अशा दोघांच्या आरोग्यासाठी चांगले असते. 

पाठीच्या कण्याचे आरोग्य टिकवायचे असेल तर त्यासाठी अजून एक उत्तम उपाय म्हणजे नियमित व्यायाम.  ताडासन, अर्धशलभासन, स्कंध चक्र, मार्जारासन, संतुलन क्रियायोगातील स्थैर्य, समर्पण, विस्तारण ही आसने मानेच्या-पाठीच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. मानेचे सोपे व्यायाम, उदा. ताठ बसून मान हलकेच मागे नेणे, पुढे आणणे, डावी-उजवीकडे फिरविणे, खांद्यांच्या बाजूला शक्‍य तेवढी वाकवणे, पुन्हा सरळ करणे याप्रकारचे व्यायाम करता येतात. बैठे काम असणाऱ्यांनी, विशेषतः संगणकावर काम करावे लागणाऱ्यांना तर हे व्यायाम खुर्चीत बसल्या बसल्या सुद्धा करता येतात. 

प्राणायाम, दीर्घश्वसन किंवा या दोघांचा एकत्रित परिणाम देणारे ॐकार गुंजन सुद्धा पाठीच्या कण्यासाठी उत्कृष्ट उपाय होय. या उपायांनी हवेतील प्राणशक्‍ती अधिक प्रमाणात मिळू शकते व ती मेंदू, मेरुदंड यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्‍यक असते. प्राणशक्‍तीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झाला की वेदना, जखडणे, अवघडणे यासारख्या तक्रारींना वाव मिळत नाही, उलट रक्‍ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते. रोज किमान दहा-पंधरा मिनिटे यासाठी काढली तर पाठीच्या कण्यासंबंधी त्रास होण्यास प्रतिबंध होऊ शकेल.

खरे तर या उपायांनी पाठदुखी, कंबरदुखी उद्‌भवणारच नाही, मात्र पाठ दुखायला लागली तर त्यावर वातशमनाच्या दृष्टीने पाठीचा विशेष मसाज, शेक, बस्ती यासारखे उपचार करता येतात. मसाज करायचा झाला तर मसाजच्या तंत्राएवढेच मसाजचे तेल उत्तम असावे लागते.उत्तम वीर्याच्या, शक्‍तीने पूर्ण अशा रास्ना, बला, अश्वगंधा वगैरे वातशामक व मणक्‍यांना व नसांना पुनर्जीवित करू शकणाऱ्या वनस्पतींबरोबर अनेक तास अग्निसंस्कार करून सिद्ध केलेल्या ‘कुंडलिनी सिद्ध तेला’सारखे तेलच या कामी आवश्‍यक असते. अशा तेलाने फक्‍त वेदनाशमनच होत नाही तर आतील झीज भरून यायला मदत होते, वाताचे शमन होते, मणके व डिस्क लवचिक राहण्यास मदत मिळते. अशा तेलाचा मसाज (उदा. कुंडलिनी मसाज) प्रशिक्षित मसाजिस्टकडून मिळणे हा पाठदुखीवरचा उत्कृष्ट उपचार असतो, मात्र असे तेल नियमित पाठीवर जिरवण्यानेही खूप चांगला उपयोग होताना दिसतो.
स्नेहनाबरोबर ‘स्वेदन’ हा वातावरील दुसरा प्रभावी उपचार होय. पाठीला तेल लावून नंतर शेकल्यानेही कंबर दुखायची कमी होते. हा शेक एरंड किंवा निर्गुडीच्या पानांनी करता येतो किंवा वातशामक द्रव्यांच्या वाफेने घेता येतो किंवा वातशामक द्रव्ये शिजवून, तेलासह परतून त्याची पुरचुंडी बांधून त्या पुरचुंडीने मसाज व शेक देता येतो तसेच ‘स्पाईन पोटली’ हा उपचारही करता येतो. 

बस्ती फक्‍त पोट साफ होण्यासाठी असते हा एक गैरसमज आहे. आयुर्वेदिक पद्धतीने दिलेली सिद्ध तेलाची बस्ती वाताचे संतुलन करते, मणक्‍यांना उचित स्निग्धता, लवचिकता प्रदान करते आणि कंबरदुखी खऱ्या अर्थाने बरी होण्यास मोलाची मदत करते. इथेही तेल कच्चे असून चालत नाही तर ते दशमूळ, एरंडमूळसारख्या अनेक वातशामक औषधांनी संस्कारित केलेले असणे आवश्‍यक असते. प्रशिक्षित थेरपिस्टकडून एकदा-दोनदा बस्ती घेतली तसेच बस्ती घेण्याची पद्धत समजून घेतली तर घरच्या घरीसुद्धा तयार बस्ती पाऊचच्या मदतीने नियमितपणे बस्ती घेता येऊ शकते. 

याशिवाय पाठदुखीसाठी वातशामक, मणक्‍यांची ताकद वाढवणारी, नसांचे पुनर्ज्जीवन करणारी औषधे देता येतात,  योगराजगुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, गोक्षुरादि चूर्ण, वातबल गोळ्या, दूध साखरेसह संतुलन प्रशांत चूर्ण, शतावरी घृत वगैरे औषधांनी उत्तम फायदा होताना दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com