शूलरोग-पथ्यापथ्य

शूलरोग-पथ्यापथ्य

वेदना हे खरे तर रोगाचे एक लक्षण असते. त्या त्या रोगानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेदना होत असतात. ‘शूलरोग’ मुख्यत्वे अपचनाशी संबंधित आहे. यामुळे यात सहसा पोटात दुखते व बरगड्या, पाठ, कंबर वगैरे ठिकाणीसुद्धा वेदना सुरू होऊ शकतात. 

शूल म्हणजे वेदना. वेदना हे खरे तर रोगाचे एक लक्षण असते. त्या त्या रोगानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेदना होत असतात. आयुर्वेदात जो ‘शूलरोग’ सांगितला आहे, तो मुख्यत्वे अपचनाशी संबंधित आहे. यामुळे यात सहसा पोटात दुखते व बरगड्या, पाठ, कंबर वगैरे ठिकाणी सुद्धा वेदना सुरू होऊ शकतात. वेदना असतात तेथे वाताचे असंतुलन असतेच. मात्र याला पित्ताचा किंवा कफाचा अनुबंध मिळाला तर वेदनेचे स्वरूप बदलत जाते. उपचारात नेमकेपणा येण्यासाठी आणि लवकर गुण येण्यासाठी शूळ हा वात-पित्त-कफ दोषांपैकी कोणत्या दोषाशी संबंधित आहे हे समजून घेणे गरजेचे असते. 

वातामुळे वेदना होत असतील तर पोटात मुरडा येऊन दुखणे, कळ येणे, मलावष्टंभ असणे, खडा होणे, भूक अनियमित लागणे यासारखी लक्षणे असतात. या प्रकारच्या वातप्रधान शूलावर कुळथाचे सूप घ्यायला सुचवलेले आहे, 

वातात्मकं हन्ति अचिरेण शूलं स्नेहेन युक्‍तस्तु कुलत्थयूषः ।
ससैन्धवं व्योषयुतः सलावः सहिंगुसौवर्चलदाडिमादयः ।।
....भैषज्य रत्नाकर

कुळथाच्या सोळा पट पाणी घेऊन ते एक चतुर्थांश उरेपर्यंत उकळावे. याला तूप व हिंगाची फोडणी द्यावी, तसेच बरोबरीने सुंठ, मिरी, पिंपळी, सैंधव, काळे मीठ, डाळिंबाचे दाणे ही द्रव्ये मिसळून प्यायला द्यावे. 

अपचनामुळे पोट फुगणे, पोटात गुडगुड आवाज येणे, पोट साफ न होणे वगैरे लक्षणे असतात, बरोबरीने बरगड्या, पाठ, कंबर या ठिकाणी वेदना असतात, पोटातही दुखत राहते, अशा वेळी आल्याच्या रसात सैंधव, हिंग, ओवा पूड, जिरे पूड मिसळून तयार केलेले चाटण थोडे थोटे घेण्याने बरे वाटते. चाटण घेतल्यानंतर भूक लागेल तेव्हा तांदळाची पेज किंवा मऊ भात साजूक तुपाबरोबर खाणे चांगले असते. 

खड्यासारखी मलप्रवृत्ती होत असली व त्यामुळे पोटात दुखत असेल तर गरम पाण्यात किंवा तांदळाच्या पेजेत साजूक तूप मिसळून घेण्याचा उपयोग होतो. तसेच लिंबू, पपनस, आवळा, संत्री वगैरे आंबट फळांच्या रसात किंवा कोकमाच्या सारात जिरे, हिंग, ओवा, बडीशेप, सैंधव यासारखी पाचक व अनुलोमक द्रव्ये मिसळून घेता येतात. गुदभागी तसेच नाभीवर एरंडेल लावण्याचाही फायदा होतो. 
पित्तामुळे शूळ होत असेल तर पोटात आग होणे, वारंवार तहान लागणे, मळमळणे, क्वचित उलट्या किंवा जुलाब होणे यासारखी लक्षणे असतात. रिकाम्या पोटी वेदनांची तीव्रता वाढते. यावर ‘यवपेया’ घ्यायला सुचवली आहे. 
 

छर्द्याज्वरे पित्तभवेऽथ शूले घोरे विदाहे त्वतितर्षिते च ।
यवस्यपेयां मधुनाविमिश्रां पिबेत्‌ सुशीतां मनुजः सुखार्थी ।।
....भैषज्य रत्नाकर

उलट्या, ताप, पित्तामुळे होत असणारा उदरशूळ, दाह, वारंवार तीव्र तहान लागणे ही लक्षणे असताना यवाची पेया बनवून ती थंड म्हणजे सामान्य तापमानाची झाली की त्यात मध मिसळून प्यायला द्यावी. यामुळे उष्णतेशी संबंधित सर्व त्रास दूर होतात. यवाची पेया बनविण्यासाठी यव चौदा पट पाण्यात शिजवावेत, व्यवस्थित शिजले की अग्नी देणे बंद करावे. 
 

धात्र्या रसं विदार्या वा त्रायन्ती गोस्तनाम्बुना ।
पिबेत्‌ सशर्करं सद्यः पित्तशूलनिषूदनम्‌ ।।
....भैषज्य रत्नाकर

आवळ्याचा रस किंवा द्राक्षांचा रस साखर मिसळून घेण्यानेही पित्तज शूळ बरा होतो. 

लाल तांदूळ दूध-साखरेसह शिजवून तयार केलेली खीर खाण्याने साळीच्या लाह्या चावून खाण्याने सुद्धा पोटातील पित्त शोषले जाऊन दाह, वेदना कमी होतात. जेवणानंतर पोटात आग होत असेल, वेदना होत असल्या तर जेवणानंतर लगेच मनुका, द्राक्षे, डाळिंब, अंजीर यापैकी एखादे फळ खाण्याने बरे वाटते. स्वयंपाक करताना ओले खोबरे, धणे, चिंचेच्या ऐवजी कोकम, तेलाऐवजी घरी बनविलेले साजूक तूप, मिरचीच्या ऐवजी आले वापरणेही चांगले असते. 

कफामुळे शूल होत असेल तर बरोबरीने घशात-छातीत कफ साठल्यासारखा वाटतो, डोके तसेच पोटात जडपणा जाणवतो, तोंडाला चव नसते, वेदना तीव्र नसतात अशा वेळी सर्वांत उत्तम उपाय असतो लंघन.
 

श्‍लेष्मांतके छर्दन-लंघनानि ।
....भैषज्य रत्नाकर

वमन व लंघन हे कफजशूळावरील उत्तम उपाय असतात. कफज शूलात बऱ्याचदा एक-दोन उलट्या होऊन जातात. किमान अशी उलटी थांबविण्याचा प्रयत्न न करणे आणि भूक लागल्याशिवाय न जेवणे हे कफजशूलात महत्त्वाचे असते. भूक लागल्यावर, 
 

मधूनि गोधूमयवान्‌ अरिष्टान्‌ सेवेत रुक्षान्‌ कटुकांश्‍च सर्वान्‌ ।
....भैषज्य रत्नाकर

मध, गहू, यव यांच्यापासून बनविलेले आहारपदार्थ, विविध प्रकारची अरिष्टे, गुणाने रुक्ष पदार्थ, तिखट पदार्थ सेवन करावेत. 

यादृष्टीने प्यायचे पाणी गरम  असावे, सुंठीबरोबर उकळून घेतलेले असावे. शेवगा, कारले, मेथी यांची भाजी, आले, लसूण यांची चटणी, कुळथाची उसळ, गहू व यवाची पोळी किंवा भाकरी अशा गोष्टींचा समावेश असावा.

जेवणानंतर लवंग, वेलची, केशर, दालचिनीयुक्‍त विडा खाणे, व्यवस्थित भूक लागत नाही तोपर्यंत रात्री न जेवणे हे सुद्धा कफज शूलात उपयुक्‍त असते. 

शूलरोगात पथ्य  
जुना तांदूळ, गहू, यव, पडवळ, कारले, दुधी, कोहळा, मूग, कुळीथ, ताक, लोणी, डाळिंब, कवठ, द्राक्षे, नारळ, मनुका, अंजीर, आले, लिंबू, संत्री, आवळा, मध, लसूण, ओली हळद, मुळा, सैंधव, काळे मीठ, हिंग, बडीशेप, लवंग, सुंठ वगैरे. 

शूलरोगात अपथ्य  
मका, बाजरी, साबुदाणा, रताळी, अळू, अंबाडी, वाल, उडीद, पावटे, कैरी, अदमुरे दही, थंड पाणी, मिठाया, तळलेले पदार्थ, मद्यपान, विरुद्ध अन्न वगैरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com