ती वीस-पंचवीस मिनिटे 

डॉ. विद्याधर बापट
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

सोबतचा मजकूर 'फॅमिली डॉक्टर'च्या 28 जुलै 2017 अंकात प्रसिद्ध झालेला आहे.

पॅनिक ॲटॅक्‍स डिसऑर्डर हल्ली खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येते. संपूर्ण शारीरिक तपासणी करून कुठलाही शारीरिक आजार नसल्याचा निर्वाळा डॉक्‍टरांनी दिला, तरीसुद्धा छातीत दुखणे, डोके दुखणे व काहीतरी भयानक आजार असण्याची जवळजवळ खात्री पटून, मृत्यूच्या भीतीने हतबल होऊन जाणे, हे यात घडते.

संध्याकाळची वेळ. सात साडेसातची. हिंजवडीहून संदीप परत येत होता. त्याच्या आय. टी. कंपनीतून.  नेहमीप्रमाणे वाहनांची प्रचंड गर्दी. जाम वैताग आणणारे. हळूहळू गाडी पुढें सरकत होती. सगळ्या वातावरणात कंटाळा भरलेला. घरी जाण्याची प्रत्येकाला घाई. पण प्रत्येकजण हताशपणे आपापल्या गाडीत कैद झाल्यासारखा. सवयीनें म्युझिक सिस्टीममधून पाघळत असलेलें म्युझिक. सूर कानावर येत होते, पण आत पोहोचत नव्हते. तसें पाहिलें तर प्रत्येकजण शरीरानें फक्त घरी चालला होता. मनात डेड लाइन्स, टार्गेट्‌स, कस्टमर कॉल्स, दिवसभरातली मॅनेजमेंटची बोलणी किंवा सहाय्यकांशी झालेली बाचाबाची वगैरे गोष्टी चालूच.   

चौकात सिग्नलला संदीप थांबला. आणि अचानक त्याला गुदमरल्याची भावना जाणवायला लागली. छातीत दुखतेंय असें वाटायला लागलें. डावा हात दुखायला लागला. ही लक्षणें कुठेंतरी ऐकली होती. हार्ट ॲटॅक तर नसेल? त्याला नको नको त्या गोष्टी आठवायला लागल्या. त्याच्या मित्राचा अभिजीतचा दोन महिन्यांपूर्वी अचानक  हार्ट ॲटॅकने झालेला मृत्यू. लहानपणी शेजारच्या लेले काकांचा सकाळी पेपर वाचता वाचता झालेला मृत्यू, डोक्‍यापासून पायापर्यंत बर्फासारखी थंडगार शिरशिरी पसरत गेली. तो हादरला. नक्कीच हार्ट ॲटॅक. सिग्नलला त्यानें गाडी डाव्या बाजूच्या रस्त्यावर घेतली. आणि वेगात जवळच असलेल्या हॉस्पिटलच्या दारात थांबवली.    

डॉक्‍टरनी तपासलें. ईसीजी काढला. तो अगदी नॉर्मल आला होता. रक्तदाब थोडा वाढला होता. पण डॉक्‍टर म्हणाले, दिवसभराचा थकवा आणि घाबरल्यामुळे तो अगदी थोडा वाढलाय. घरी जाऊन विश्रांती घ्यायला सांगितली. तो पुन्हा पुन्हा विचारत होता. हार्ट ॲटॅक नक्की नाही ना? त्यांनी नक्की नाही असें सांगितलें. पण संदीपचें समाधान झालें नाही. बीपी नॉर्मलचा आकडा मनात सारखा येत होता. थोडें जास्त आलेंच कसें? इंटरनेटवर वाचलेली हार्ट ॲटॅकची लक्षणें मनात येत होती. आणखी कुणाला तरी दाखवायला हवें. दुसऱ्या मोठया हॉस्पिटलमध्ये जायला हवें. त्यानें स्वातीला, त्याच्या बायकोला फोन करून मोठया हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलें. मोठया हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञांनी तपासलें. त्यांनीही सांगितलें की, सर्व नॉर्मल आहे. थोडी विश्रांती घ्या. तात्पुरतें समाधान झालें. घरी आल्यावर रात्री झोप नाही. सतत ताण. काहीतरी असणार नक्की. स्वातीनें खूप समजावलें. दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्‍टरनी स्वस्थ वाटण्याच्या गोळ्या दिल्या. त्यानें मात्र बरें वाटलें. दोन दिवसांनी कामावर रुजू झाला. पण मनात कोपऱ्यात भीती थोडी होतीच. आठच दिवसानंतरची गोष्ट. ऑफिसमध्ये महत्त्वाची बैठक होती. त्यापूर्वी अर्धा तास आधी पुन्हा अस्वस्थ वाटायला लागलें. छातीत दुखतेंय असें वाटायला लागलें. घाम आला. भीतीनें कापरें भरलें. हे साधारण वीस-पंचवीस मिनिटे चाललें होतें. मागच्या वेळेला नसेल, पण आज नक्की गंभीर काही तरी आहे. मित्राला घेऊन बाहेर पडला. शहरातल्या दुसऱ्या नामांकित हृदयरोग तज्ज्ञांकडे गेला. त्यांनी दोन दिवसात सर्वं टेस्ट्‌स केल्या. सर्व रिपोर्टस नॉर्मल होते. त्यांनी धीर दिला. काही मन:शांतीच्या गोळ्या दिल्या व गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचें सुचवलें. 

हे आहे तरी काय?
संदीप थोडा सावरला. पण मग काही काळानंतर सतत पुन्हा पुन्हा छातीत दुखल्यासारखें वाटणें, विलक्षण भीती वाटणें हा प्रकार चालूच राहिला. प्रत्येक वेळी हे साधारण वीस-पंचवीस मिनिटे व्हायचें. मनाच्या तळाशी दबा धरून बसलेली भीती कधी बाहेर येईल याचें दडपण कायम राहिलें. आयुष्यातली स्वस्थताच हरवली होती. घरच्यांनी, बाहेरच्यांनी सगळ्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण सगळे प्रयत्न फोल ठरले. संदीपच्या बाबतीत नेमके  काय घडत होतें? सगळे रिपोर्टस नॉर्मल आहेत हे डॉक्‍टरांनी वारंवार सांगूनसुद्धा त्याला पुन्हा पुन्हा छातीत दुखणें आणि पंधरा-वीस मिनिटे विलक्षण भीतीची लक्षणे हे सगळें काय होतें ? संदीपला पॅनिक ॲटॅक्‍स येत होते आणि पॅनिक ॲटॅक्‍स डिसऑर्डर सुरु झाली होती. 

पॅनिक ॲटॅक्‍स डिसऑर्डर - हल्ली खूप मोठया प्रमाणावर ही आढळून येते. संपूर्ण शारीरिक तपासणी करून कुठलाही शारीरिक आजार नसल्याचा निर्वाळा डॉक्‍टरांनी दिला तरी सुद्धा छातीत दुखणें, डोकें दुखणें व काहीतरी भयानक आजार असण्याची जवळजवळ खात्री पटून, मृत्युच्या भीतीनें हतबल होऊन जाणें, हे यात घडतें.  

जाणावी लक्षणे
या आजारात पुढीलपैकी लक्षणे दिसू शकतात.
श्वास पुरत नाही असे वाटते. 
छातीत धडधडते. 
 छातीत दुखते.
    शरीराचा थरकाप होतो. 
    गुदमरल्यासारखी भावना होते. 
    घाम फुटतो.
    मळमळतें किंवा पोट बिघडल्याची भावना होते. 
    बधिरता येते. 
आणि सर्वात महत्वाचें म्हणजे मृत्यू येईल अशी प्रचंड भीती वाटायला लागते.

 साधारण वीस-पंचवीस मिनिटें ही भावना टिकू शकते आणि या दरम्यान व्यक्ती हतबल आणि हताश होऊन जाते. त्यानंतर सगळें नॉर्मल झालें तरी पुन्हा असें कधी होईल ही भीती आत दबा धरून बसते आणि मग ज्या ठिकाणी असें पूर्वी झालेंले असते ती ठिकाणें आणि प्रसंग टाळले जायला लागतात.      

का घडते?       
पॅनिक ॲटॅक्‍स डिसऑर्डरचे प्रमुख कारण म्हणजे मेंदूतील न्युरोकेमिकल्सचे असंतुलन. याखेरीज आनुवांशिकता हा ही या आजाराचा भाग असू शकतो. इतर कारणे अशी -
पूर्वायुष्यातील, विशेषत: लहान वयातील दुर्दैवी प्रसंग वा मृत्युसारख्या घटना पाहिल्यामुळे मनात बसलेली भीती.

विचार करण्याची सदोष पद्धती.
लहानपणापासून शरीरातील किरकोळ आजार मोठा मानण्याची मनाची सवय किंवा तशी भीती बाळगण्याची सवय. 
अस्वस्थतेचा इतर आजार, नैराश्‍य किंवा इतर मानसिक आजाराबरोबरसुद्धा हा आजार असू शकतो. 
जवळच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू, घटस्फोटासारखी दुर्दैवी घटना, आर्थिक फटका किंवा इतर मानसिक आघातांमुळे हा आजार जडू शकतो
लहानपणी वा नंतर अनुभवलेल्या  लैंगिक अत्याचारामुळे झालेला मानसिक आघात, दाबून टाकलेल्या या संदर्भातील स्मृती ही कारणेंही असू शकतात.

उपाययोजना 
योग्य त्या औषधोपचाराबरोबरच सायकोथेरपीज अतिशय आवश्‍यक आणि उपयुक्त ठरतात. उदा. सीबीटी थेरपी, एक्‍स्पोझर थेरपी, रिलॅक्‍सेशन्स थेरपीज, माइंडफुलनेस बेस्ड थेरपीज, सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन थेरपी (एसडीटी) म्हणजे पद्धतशीरपणे भीतीचें निर्बलीकरण करणे, पायरी पायरीने भीतीवर मात करणे. भीतीच्या निर्बलीकरणासाठी व्हर्च्युअल रिॲलिटी व इमेजरिजचा (कल्पनाचित्रांचा) वापर इत्यादी उपयुक्त ठरतात.

मुख्य म्हणजे विचार करण्याची अयोग्य पद्धत आणि चुकीची प्रतिक्रिया देण्याची मनाची आणि त्यामुळे शरीराची सवय बदलण्याचा प्रयत्न महत्वाचा असतो. विचार करण्याची योग्य पद्धत रुजवणें, तसेंच प्रत्यक्ष ॲटॅक येत असताना कसे वागायचे, वास्तव विचार कसा करायचा,  कुठली पाऊले उचलायची, श्वासाचा कसा वापर करायचा, मन पद्धतशीरपणे दुसरीकडे कसे वळवायचे, मृत्यूच्या भीतीतून मन दुसरीकडे कसें वळवायचे वगैरे गोष्टींच्या प्रशिक्षणाचा खूप उपयोग होतो. ॲटॅक नसताना इतर वेळी पद्धतशीरपणे मनाला प्रशिक्षण द्यावें लागतें. जुन्या दबलेल्या भीती काढून टाकाव्या लागतात. स्वत:वर, स्वत:च्या नकारात्मक भावनांवर, चुकीच्या विचारपद्धतीवर ताबा मिळवण्याची तयारी व त्यासंदर्भातला आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. मुळात आपल्याला कुठलाही शारीरिक आजार नाही हे तज्ज्ञांनी स्पष्ट केलें आणि शारीरिक आजार नसताना, तो असल्यासारखी लक्षणे का जाणवतात, असें का होतें हे समजून घेणें आणि ते संपूर्ण बरें होऊ शकतें यावर विश्वास ठेवून  त्यासाठी मनापासून पद्धतशीर प्रयत्न करणें (सेल्फ हेल्प) महत्वाचें आहे.  

पॅनिक ॲटॅक्‍सची ती वीस-पंचवीस भीतीदायक, हतबल करून टाकणारी असतात. पण योग्य आणि वेळेवर उपाययोजना केल्याने त्यातून मुक्तता होऊ शकते.

सोबतचा मजकूर 'फॅमिली डॉक्टर'च्या 28 जुलै 2017 अंकात प्रसिद्ध झालेला आहे.