#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’चा नियमित वाचक आहे. माझे वय ३५ वर्षे आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मला खुब्याच्या सांध्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने एमआरआय काढला, त्यात खुब्याच्या सांध्याला नीट रक्‍तपुरवठा होत नाही असे समजले. सध्या मी संतुलन शांती सिद्ध तेल वापरतो आहे, त्याने चांगला गुण येतो आहे. यासोबत आणखी कोणते औषध घ्यावे, याबद्दल मार्गदर्शन करावे.
... हाराळे 
उत्तर :
‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावणे चांगलेच, बरोबरीने वातशमनासाठी आणि रक्‍ताभिसरण सुधारण्यासाठी संपूर्ण अंगाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ वापरून अभ्यंग करणेसुद्धा चांगले. अशा केसेसमध्ये विशेष बस्ती (म्हणजे औषधांनी संस्कारित दुधाची किंवा तेलाची बस्ती), शालिषष्टी पिंडस्वेदन वगैरे उपचारांचा उत्तम फायदा होताना दिसतो. बरोबरीने तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’, त्रयोदशांग गुग्गुळ, ‘संतुलन वातबल’ गोळ्या, महारास्नादी काढा वगैरे औषधे घेणेही चांगले. मात्र पंधरा वर्षांपासून त्रास आहे आणि फार लहान वयात त्रास सुरू झाला आहे हे लक्षात घेता वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे आणि आवश्‍यक ते उपचार सुरू करणे उत्तम होय.

------------------------------------------------------------------------------

‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीचा मला खूप उपयोग होतो. दर शुक्रवारी ही पुरवणी वाचल्याशिवाय चैन पडत नाही. माझे वय ४२ वर्षे असून, मला पाच वर्षांपासून त्वचेशी संबंधित त्रास होत आहेत. प्रथम अंगावर काळपट रंगाचे चट्टे, रेषा येत होत्या, नंतर सर्व अंगाला खाज येऊ लागली. त्वचारोगतज्ज्ञांनी दिलेल्या औषधांचे खूप दुष्परिणाम दिसू लागले. सध्या मी संतुलनच्या मंजिष्ठासॅन गोळ्या आणि मंजिसार आसव घेते आहे. काळपटपणा कमी होतो आहे. मात्र, खाज अजूनही कमी होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
.... सरिता
उत्तर :
या प्रकारच्या त्रासावर रक्‍तशुद्धी करणे आवश्‍यक होय. ‘मंजिष्ठासॅन गोळ्या’ आणि ‘संतुलन मंजिसार’ आसव घेणे चांगलेच आहे. बरोबरीने पंचतिक्‍त घृत हे औषधांना सिद्ध केलेले तूप सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा घेणे चांगले. पाच वर्षांपासून त्रास होतो आहे, तेव्हा मुळापासून उपचार होण्याच्या दृष्टीने वैद्यांच्या सल्ल्याने रक्‍तशुद्धीकर बस्ती घेण्याचा उपयोग होईल. स्नानाच्या वेळी साबणाऐवजी ‘सॅन मसाज पावडर’ व मसुराचे पीठ यांचे मिश्रण वापरण्याचा फायदा होईल. कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, वांगे, गवार, दही, आंबवलेले पदार्थ, अंडी, मांसाहार टाळणे हेसुद्धा चांगले.  

------------------------------------------------------------------------------
मी ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील लेख वाचून गेल्या चार महिन्यांपासून सुवर्णसिद्ध जलाचा वापर करतो आहे. यापासून मला बराच फायदा झाला आहे. मला असे विचारायचे आहे, की सहा महिन्यांच्या मुलास असे सुवर्णसिद्ध जल दिले तर चालेल का?
 .... शिवाजी
उत्तर :
अगदी तान्ह्या बाळालासुद्धा प्यायला द्यायचे पाणी सुवर्णसिद्ध असणे उत्तम असते. लहान मुलांमध्ये मेंदूचा विकास झपाट्याने होत असतो आणि सुवर्ण बुद्धी, स्मृती, मेधावर्धनासाठी, मेंदूच्या एकंदर विकासासाठी सर्वोत्कृष्ट रसायन असते. म्हणून लहान मुलांना ‘संतुलन बालामृत’, ‘संतुलन अमृतशर्करा’, सुवर्णसिद्ध जल असे सुवर्णयोग नियमित देत राहणे उत्तम असते. 

------------------------------------------------------------------------------

माझ्या यजमानांचे वय ६० वर्षे आहे. दिवसभर ते कितीही काम करू शकतात, तेव्हा त्यांना काहीही त्रास होत नाही; परंतु रात्री झोपल्यावर त्यांच्या पायाच्या पोटऱ्या खूप दुखतात. त्यामुळे त्यांना झोपही नीट लागत नाही. कृपया उपाय सांगावा.
..... प्रमिला
उत्तर :
पोटऱ्या दुखणे किंवा पोटऱ्यांमध्ये गोळे येणे याचा संबंध पोटाशी असू शकतो. तसेच ते शरीरात वातदोष वाढल्याचे, शरीरशक्‍ती कमी असल्याचेही एक लक्षण असू शकते. पचन सुधारण्यासाठी तसेच शक्‍ती वाढण्यासाठी यजमानांच्या आहारात कमीत कमी पाच चमचे तरी घरी बनविलेले साजूक तूप समाविष्ट करणे चांगले. जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या, रात्रीच्या जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण घेण्याचाही उपयोग होईल. शक्‍ती वाढण्यासाठी तसेच वातशमनासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी सर्वांगाला, विशेषतः पायांना ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. काही दिवस ‘संतुलन वातबल’ गोळ्या, तसेच प्रवाळपंचामृत गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. रोज सकाळी च्यवनप्राश, धात्रीरसायन, ‘सॅनरोझ’, ‘मॅरोसन यांसारखी एक-दोन रसायने सेवन करण्यानेही शरीरशक्‍ती सुधारली की पोटऱ्या दुखणे क्रमाक्रमाने कमी होईल.

------------------------------------------------------------------------------

‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शन आरोग्य टिकविण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. गेल्या दीड महिन्यापासून मला नेहमीसारखी भूक लागत नाही व जेवणाची इच्छा होत नाही. अन्न समोर आले तरी नकोसे वाटते. सकाळी उठल्यानंतर मळमळ जाणवते व अस्वस्थ वाटते. काही वेळा व्यवस्थित भूक लागते, तेव्हा नेहमीप्रमाणे जेवतो; परंतु नंतर पुन्हा जेवणाची इच्छा होईनाशी होते. यामुळे फारच निरुत्साही वाटते. काही काम करावेसे वाटत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
.... उदय परचुरे    
उत्तर :
कधी भूक लागणे, कधी न लागणे हे अग्नीच्या विषमतेचे पर्यायाने वातदोषामुळे अग्नी बिघडल्याचे लक्षण असते. यावर प्यायचे पाणी उकळलेले व गरम असताना पिणे चांगले होय. जेवताना सुरुवातीला घासभर भातात अर्धा किंवा पाव चमचा हिंग्वाष्टक चूर्ण थोडेसे तूप मिसळून सेवन करणे व जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या घेणे चांगले. भूक असेल तेवढेच जेवणे, भूक नसताना फक्‍त आले, बडीशेप टाकून उकळलेले पाणी घोट घोट पिणे चांगले. मळमळ होईल त्या वेळी मूठभर साळीच्या लाह्या चावून खाण्याचाही फायदा होईल जेव्हा भूक लागेल तेव्हा साधे व हलके जेवण करणे श्रेयस्कर. या सर्व उपायांनी अग्नी समस्थितीत आला की उत्साह वाढेल, काम करण्याची इच्छा होईल. रोज सकाळी चालायला जाणे, दीर्घश्वसन किंवा लोम-विलोम करणे यानेसुद्धा अग्नी संतुलित होण्यास मदत मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com