कुटुंबाचे आरोग्य 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मनुष्यातील स्वार्थ वाढला, की त्याला स्वतःपुरते दिसायला लागते आणि मग त्याला इतर माणसांची कटकट वाटू लागते. तरुण मंडळी ज्येष्ठांशी पटत नाही म्हणून कुटुंब तोडायला निघतात. अशा तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे, की त्यांचेही वय एक ना एक दिवस वाढणार आहे, तेव्हा एकटेपणा त्यांना खायला उठेल. तेव्हा त्यांना पटेल, की कुटुंबातील लहानथोरांना एकत्र राहून म्हणजेच कुटुंबसंस्थेचे आरोग्य सांभाळून जगणे हेच आनंदी आयुष्याचे सूत्र आहे. 

कुटुंबाचे आरोग्य म्हणजे कुटुंबात ज्या अनेक व्यक्‍ती असतात, त्यांचे आरोग्य किंवा कुटुंब नावाची जी संस्था तिचे आरोग्य. सध्या कुटुंबसंस्थेच्या आरोग्यावर अधिक विचार करण्याची आवश्‍यकता आहे असे दिसते. कुटुंब म्हटले, की त्यात अनेक व्यक्‍ती, रक्‍ताच्या नात्याने, प्रेमाच्या नात्याने, सोयीने एकत्र राहून आपला व्यवहार सांभाळतात असे गृहीत धरले तर सध्या कुटुंबसंस्था मोडकळीस येत आहे असे म्हणावे लागेल. मनुष्यातील स्वार्थ वाढला, की त्याला स्वतःपुरते दिसायला लागते आणि मग त्याला इतर माणसांची कटकट वाटू लागते. मनाचा ताबा इंद्रियांनी घेतला की उच्छृंखल वागण्याकडे ओढा तयार होतो, नीती-अनीतीच्या कल्पना ठिसूळ होतात. मनाला वाटेल तसे वागणे म्हणजे व्यक्‍तिस्वातंत्र्य अशी कल्पना डोक्‍यात पक्की झाली, की इतरांचा त्रास होऊ लागतो. शिवाय अनुभवी व्यक्‍तींचे वय जास्त असल्यामुळे त्यांच्या कल्पना, त्यांची जीवनपद्धती आणि बदललेल्या काळानुसार तरुणांची जीवनपद्धती यात अंतर वाढत जाऊ शकते. मोठ्यांना काळाकडे थोडे अधिक वेगाने जाता यावे आणि तरुणांना एकदम काळाच्या पुढे धावण्याची इच्छा व्हावी. या दोन्हींवर नियंत्रण राहिले तर त्यांच्यात समतोल राहू शकतो, अन्यथा त्यांचा एकमेकाला त्रास होतो. अशा अनेक कारणांमुळे कुटुंबसंस्था मोडकळीस येताना दिसते. 

अर्थात, एकत्र कुटुंबसंस्था मोडल्याचे फायदे थोडे, तोटे अधिक. ज्यांनी आपल्या अपत्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकवले त्याच वडिलांना म्हातारपणी हवा असलेला आधार देण्याची अपत्याची इच्छा नसल्याने त्यांना म्हातारपणी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो. ज्या आईने आपले अपत्य लहान असताना त्यांची काळजी घेतली, त्या आईला फक्‍त नातवंडांची बेबी सिंटीग करण्याची वेळ आली असता प्रेम दाखवायचे व परदेशी बोलवायचे यामुळेही मने दुखावलेली राहतात. मायेचे ब्लॅकमेलिंग करून तिला गरजेच्या वेळी बोलावून घेतले तरी हे सर्व कामापुरते असले व नंतर तिची अडगळ होणार असली, तर कुटुंबसंस्थेला धक्का पोचतो. 

खरे पाहता एकत्र कुटुंबसंस्थेचे तोटे कमी व फायदे जास्त आहेत. राहत्या जागेची मांडणी करताना जिने, बाल्कनी, पॅसेज वगैरे जागा घरातील सगळ्यांना उपयोगी पडेल अशा असतात. प्रत्येक व्यक्‍तीने स्वतंत्र राहण्याचे ठरविले तर त्याला जागा मोठी लागते. कधी कधी कुटुंबव्यवस्था मोडकळीला आली की माणसा-माणसांत अंतर पडते. यातील सर्वांत मोठा मुद्दा आहे तो म्हणजे यामुळे लहान मुलांची होणारी आबाळ. 

कुटुंबसंस्थेच्या आरोग्यावर कुटुंबातील व्यक्‍तींचे आरोग्यही अवलंबून असते. नियम पाळावे लागू नयेत व त्यासाठी आपल्याला कोणी काही बोलू नये हा उद्देश असल्यामुळे मोठी माणसे घरात नको वाटतात. माझे-तुझे या कल्पनेतूनही काही मंडळी स्वतंत्र होतात व त्यामुळे कुटुंबव्यवस्था कोलमडते असेही बऱ्याच वेळा दिसते. परंतु वयस्कर मंडळींच्या अनुभवाचा उपयोग झाल्याची असंख्य उदाहरणे समाजात दिसून येतात. एकत्र कुटुंबव्यवस्थेमुळे एखादी-दुसरी गैरसोय झाली, तर त्यापासून मिळणारे फायदे अनेक असतात. घरातील पती- पत्नी दोघेही नोकरीनिमित्ताने बाहेर जात असतील अशा वेळी कुटुंबात कुणाला आजारपण आले, घरात बाळंतपण आले तर एकत्र कुटुंबव्यवस्थेचा उपयोग कळून येतो. शिवाय एकत्र कुटुंबव्यवस्थेत दरडोई खर्च कमी होऊ शकतो. चार भाऊ वेगळे राहू लागले की चार टीव्ही, चार वॉशिंग मशिन, चार गॅस अशा सर्व सुखसोई चाराच्या पटीत असणे आवश्‍यक होऊन बसते. हेच चार भाऊ एकत्र राहिल्यास घरात एक किंवा दोन टीव्हीवर भागते, अर्थात खर्च कमी होतो. दुसऱ्या भावाकडे अधिक शिल्लक असली तर कुटुंबात आजारपण आल्यास किंवा अचानक इतर काही खर्च उद्‌भवल्यास त्याची मदत होऊ शकते. कर्ज काढण्यासाठी इकडेतिकडे पळावे लागत नाही. मोठ्या अपत्याचे कपडे लहानाने वापरणे अशी परिस्थिती नसली तरी काही गोष्टी सगळ्यांनी मिळून वापरल्यास एकंदरीत खर्च कमी होतो. 

एकंदरीत पाहता, कुटुंबसंस्थेचे आरोग्य सांभाळणे खूप गरजेचे आहे. माणसाने माणुसकी वाढवली, स्वार्थ व द्वैत कमी करून प्रेमभावना वाढवली तर कुटुंबसंस्थेला उभारी यायला वेळ लागणार नाही. शेवटी रक्‍ताची ओढ व नात्याची ममता आत कुठेतरी असतेच. ज्या ज्या ठिकाणी कुटुंबसंस्थेचे आरोग्य धोक्‍यात आलेले आहे त्या कुटुंबातील तरुणांमध्ये नैराश्‍य, पती-पत्नीमध्ये घटस्फोट, जेवणाच्या बाबतीत हयगय झाल्यामुळे होणारे रोग, बाहेरचे व तयार डबाबंद अन्न खावे लागल्यामुळे होणारे रोग वाढलेले आहे असे दिसते. हा प्रकार एका भागापुरता सीमित नसून असे होण्याचे प्रमाण जगभर वाढलेले आहे असे दिसते. 

एका कुटुंबात दोघेच होते. त्यांना एकदा प्रवासाला जायचे होते. घरातील कुत्र्याला कुणाकडे सोडून जावे यासाठी त्यांचा शोध चालू होता. अशा प्रकारे कुठल्यातरी दुसऱ्या कुटुंबातील व्यक्‍ती कुटुंबाशी जोडून घेतल्या तरच व्यवहार सोपेपणाने चालतात. माणसाला माणसाची मदत लागतेच. कोणाकडे पाहून कधीही हसले नाही, कोणालाही कधीही काहीही दिले नाही, कोणावर प्रेम केले नाही किंवा कुणाचे प्रेम मिळाले नाही तर आयुष्य कमी होते, असे दिसून येऊ लागलेले आहे. त्यामुळे कुटुंबसंस्थेचे आरोग्य सांभाळण्याशिवाय पर्याय नाही. 

कुटुंबसंस्थेचे आरोग्य चांगले राहिले तर खर्चात कपात होते, मनुष्याची भीती कमी होते, कोणीतरी पाठ थोपटल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. असे एकत्र कुटुंबसंस्थेचे अनेक फायदे दिसतात. एकत्र कुटुंबसंस्था असलेल्या घरात फार फार तर एकाचा खोकला दुसऱ्याला येईल, परंतु वयानुसार वा प्रकृतीनुसार येणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव एकाचा दुसऱ्याला होत नाही. 

कुटुंब तोडायला निघालेल्या तरुणांनी जर लक्षात घेतले की त्यांचेही वय एक ना एक दिवस वाढणार आहे, तेव्हा एकटेपणा त्यांना खायला उठेल तर त्यांना पटेल, की कुटुंबातील लहानथोरांना एकत्र राहून म्हणजेच कुटुंबसंस्थेचे आरोग्य सांभाळणे हेच आनंदी आयुष्याचे सूत्र आहे.