"फेसबुक मेसेंजर'च्या युजर्सची संख्या एक अब्जावर

"फेसबुक मेसेंजर'च्या युजर्सची संख्या एक अब्जावर
"फेसबुक मेसेंजर'च्या युजर्सची संख्या एक अब्जावर

सॅन फ्रान्सिस्को : फेसबुक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाच्या "मेसेंजर‘ ऍपने आता एक अब्ज युजरचा पल्ला गाठला आहे. फेसबुक मेसेंजर हे फेसबुकच्याच कुटुंबाचा एक भाग असून संकेतस्थळापेक्षाही जास्त वेगाने या ऍपची लोकप्रियता वाढत असल्याची माहिती फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी "फेसबुक‘ पोस्टद्वारे दिली आहे.

"आज आधुनिक युगातील या एक अब्ज युजर्सच्या प्रवासात संवादाच्या माध्यमाला आणखी उत्तम करण्यासाठी आमचे प्रयोग सुरू आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने युजर्सना अधिक चांगल्या पध्दतीने कसा संवाद साधता येईल यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत,‘ असे फेसबुकचे उपाध्यक्ष डेव्हिड मॅरकस यांनी सांगितले.

फेसबुकचे 1.6 अब्ज युजर्स असून, 2014 मध्ये "फेसबुक फॅमिली‘ने व्हॉट्‌स ऍप आणि इतर मेसेजिंग ऍप 20अब्ज डॉलरमध्ये खरेदी केल्या आहेत. याशिवाय फेसबुक "फॅमिली‘त 50 कोटी युजर्स असलेले आणि छायाचित्र शेअर करण्याची सुविधा असलेले "इन्स्टाग्राम‘ आणि आभासी वास्तवाचा अनुभव देणाऱ्या "ऑक्‍युलस‘च्या सेवांचाही समावेश आहे. "फेसबुकच्या व्यावसायिक उपयोगासाठी मेसेंजरद्वारे "बोटस्‌‘ नावाचे एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यातून सबंधित क्षेत्रातील बातम्यांची देवाण-घेवाण करता येते. मेसेंजरमध्ये आज असे 18 हजार बोटस्‌ उपलब्ध आहेत जे तुमच्या व्यवसायाला वृध्दिंगत करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. फेसबुकच्या मेसेंजरच्या मदतीने युजर्सच्या चॅटिंगमधील जाहिरातींशी सबंधित मजकूरावर लक्ष ठेवले जाते आणि त्याच्याशी सबंधित जाहिराती फेसबुकवरील टाईमलाईनशेजारी युजर्सला दिसतात. यामुळे सबंधित व्यावसायिकालाही त्याचा फायदा होतो. भविष्यात कंपनीकडून या फेसबुक साखळीचा वापर करून एखाद्या जाहिरातीचे "व्हेक्‍टर्स‘ युजर्सला कसे दिसतील यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मात्र या प्रक्रियेला पुरेसा वेळ लागणार आहे,‘ अशी माहिती मॅरकस यांनी दिली.

"व्हॉट्‌सऍप‘मध्ये प्रत्यक्ष जाहिरातीसाठी वाव नाही. मात्र युजर्सशी, सबंधित ग्राहकाशी जोडण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मेसेंजर हे ऍप आयफोन ऑपरेटिंग सिस्टिमवरील फेसबुकनंतरचे सर्वाधिक लोकप्रिय दुसऱ्या क्रमांकाचे ऍप आहे. मेसेंजरवर दर महिन्याला 17 अब्जाहून अधिक छायाचित्रे परस्परांमध्ये शेअर केली जातात. 1.2 अब्ज मेसेंजर युजर्स व्हर्च्युअल बास्केटबॉल खेळत असल्याची माहिती फेसबुकच्या सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com