85 व्या वर्षी एव्हरेस्ट चढताना शेरचान यांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

नेपाळच्या नियमांनुसार एव्हरेस्टवर चढण्यासाठी किमान वय 16 असणे आवश्यक आहे. मात्र, कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. 

काठमांडू : जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट वयाच्या 85व्या वर्षी चढण्याच्या प्रयत्नात नेपाळचे मिन बहादूर शेरचान मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे एव्हरेस्ट चढण्यासाठी वयोमर्यादा घालण्याचा विचार नेपाळचे प्रशासन करीत आहे. 

यापूर्वी शेरचान यांनी 2008 मध्ये 76 वर्षांचे असताना एव्हरेस्ट शिखर सर केले होते. त्यावेळी ही कामगिरी करणारे ते जगातील सर्वांत जास्त वयाचे गिर्यारोहक ठरले होते. मात्र, 2013 मध्ये 80 वर्षीय जपानी नागरिक युईचिरो मिउरा यांनी हा नवा विक्रम प्रस्थापित केला. तो मोडण्यासाठी शेरचान यांनी ही मोहीम सुरू केली होती, मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

एव्हरेस्टच्या शिखरांवर हवामान धोकादायक असते, तसेच ऑक्सिजनची पातळीही कमी असते. वयोवृद्ध लोकांना ही शिखरे चढण्यास परवानगी देण्याबाबत नेपाळी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशी परवानगी द्यायची की नाही याबाबत अधिकाऱ्यांचा खल सुरू आहे. नेपाळच्या नियमांनुसार एव्हरेस्टवर चढण्यासाठी किमान वय 16 असणे आवश्यक आहे. मात्र, कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. 

"कमाल वयोमर्यादेसंबंधीचा कायदा त्वरीत आणण्याची गरज आहे. अशी मर्यादा घातलेली असती तर शेरचान यांचा जीव वाचला असता," असे नेपाळ माऊंटेनीअरिंग संघटनेचे अध्यक्ष आँग त्शेरिंग यांनी सांगितले. यासाठीची कमाल वयोमर्यादा 76 करण्याची मागणी सरकारकडे करण्याचा विचार सुरू असल्याचे त्शेरिंग यांनी सांगितले. 

एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर शनिवारी संध्याकाळी 85 वर्षीय शेरचान यांना प्राण गमवावे लागले. यापूर्वी, शैलेंद्रकुमार उपाध्याय या 82 वर्षीय व्यक्तीने 2011 मध्ये एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. 
 

Web Title: 85 year old sherchan dies while climbing Everest