भारत-अफगाणिस्तान मैत्रीमुळे चीनला पोटशूळ!

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

"पाकिस्तानला डावलून भारत व अफगाणिस्तानमध्ये हवाई मार्ग (एअर पॅसेज) निर्माण करण्याचे भारताचे धोरण म्हणजे चीनच्या पाकिस्तानमधील महत्वाकांक्षी आर्थिक क्षेत्रास (सीपेक) उत्तर देण्याचा प्रयत्न,' असल्याचे मत ग्लोबल टाईम्समधील एका लेखामध्ये व्यक्त करण्यात आले आहे

नवी दिल्ली - भारत व अफगाणिस्तानमधील वाढत्या मैत्रीमुळे चीनचा उठलेला पोटशूळ आज (सोमवार) येथील सरकारी मालकीच्या वृत्तपत्रामधील एका लेखाच्या माध्यमामधून प्रतिबिंबित झाला!

"पाकिस्तानला डावलून भारत व अफगाणिस्तानमध्ये हवाई मार्ग (एअर पॅसेज) निर्माण करण्याचे भारताचे धोरण म्हणजे चीनच्या पाकिस्तानमधील महत्वाकांक्षी आर्थिक क्षेत्रास (सीपेक) उत्तर देण्याचा प्रयत्न,' असल्याचे मत ग्लोबल टाईम्समधील एका लेखामध्ये व्यक्त करण्यात आले आहे. याशिवाय भारताचे हे धोरण म्हणजे "ताठर भूराजकीय विचारा'चे उदाहरण असल्याची टीकाही या लेखाच्या माध्यमामधून करण्यात आली आहे.

सीपेक हा पाकव्याप्त काश्‍मीरमधून जात असल्याने भारताने या प्रकल्पास ठाम विरोध दर्शविला आहे. याचबरोबर, अफगाणिस्तान व इराणबरोबरील संबंध अधिकाधिक बळकट करण्यासाठी भारताकडून आश्‍वासक परराष्ट्र धोरण राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, चीनकडून ही टीका करण्यात आली आहे.