मोदींच्या अजेंड्यावर दहशतवाद

वृत्तसंस्था
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

. दिल्ली आणि बीजिंगने वादग्रस्त डोकलाममधील लष्कर तातडीने मागे घेण्याचा निर्णय 28 ऑगस्टला घेतल्यानंतर पहिल्यांदाच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचे नेते परिषदेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत

शीयामेन (चीन) - ब्रिक्‍स देशांच्या परिषदेत भारत दहशतवादाविषयीची आपली चिंता उपस्थित करेल असे मानले जात आहे. शांतता आणि सुरक्षा कायम राखण्यासंबंधी ब्रिक्‍स देशांच्या महत्त्वाच्या योगदानावर जोर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आव्हानांवर आपली मते मांडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

डोकलामच्या मुद्‌द्‌यावरून भारत आणि चीनदरम्यान निर्माण झालेला पेच 73 दिवसांनी संपुष्टात आल्यानंतर मोदी ब्रिक्‍स परिषदेच्या निमित्ताने चीनचा दौरा करत आहेत. त्यमुळे मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान होण्याची शक्‍यता असलेल्या द्विपक्षीय बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या दोन नेत्यांमधील संभाव्य बैठकीसंबंधी अद्याप कोणीही अधिकृतपणे बोललेले नाही. मात्र, येथे सुरू होणाऱ्या परिषदेच्या निमित्ताने ते एकमेकांशी संवाद साधतील असे संकेत मिळत आहेत. दिल्ली आणि बीजिंगने वादग्रस्त डोकलाममधील लष्कर तातडीने मागे घेण्याचा निर्णय 28 ऑगस्टला घेतल्यानंतर पहिल्यांदाच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचे नेते परिषदेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत.

परिषदेच्या पूर्वसंध्येला जिनपिंग यांनी, मतभेद दूर करून एकमेकांना समान मानून चांगले वातवरण तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल असे केलेले वक्तव्य अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून पाच देशां दरम्यानच्या सहकार्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

चीननंतर मोदी म्यानमारच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि देशाबरोबरच्या संबंधाला आणखी चालना देण्याच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन करावे : जिनपिंग
शीयामेन : ब्रिक्‍स गटाने खुली जागतिक अर्थव्यवस्था आणि व्यापारी उदारीकरणाचे समर्थन केले पाहिजे, असे मत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ब्रिक्‍स परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर आज येथे एका व्यावसायिक बैठकीत व्यक्त केले. आपण एकत्रितपणे एक नवी जागतिक मूल्य साखळी निर्माण करण्याच्या दृष्टीने खुली जागतिक अर्थव्यवस्था, व्यापारी उदारीकरण आणि सुलभतेवर भर दिला पाहिजे आणि एक संतुलित जागतिक अर्थव्यवस्था पुढे आणली पाहिजे, असे जिनपिंग यांनी ब्रिक्‍स देशांचे नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बोलताना सांगितले.

दरम्यान, सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात लढा देण्यासाठी समग्र दृष्टिकोन बाळगण्याचा सल्ला देतानाच जिनपिंग यांनी, दहशतवादाची मूळ कारणे शोधा म्हणजे दहशतवाद्यांना लपण्याची जागा मिळणार नाही, असे सांगितले. ब्रिक्‍स परिषदेच्या उद्‌घाटन समारंभातील जिनपिंग यांच्या भाषणात हा मुद्दा मांडण्यात येणार आहे.